धाराशिव

Ajit Pawar News | ‘जावई अजितदादा’ ही ओळख आठवणीत राहिल

Maharashtra political news | कृष्‍णा मराठवाडा, उजनी पाणी योजनेला दिली चालना

पुढारी वृत्तसेवा

भीमाशंकर वाघमारे

धाराशिव : एखाद्या कार्यक्रमाच्‍या निमित्ताने अजित दादांचा दौरा धाराशिव जिल्‍ह्यात, त्‍यातही पुन्‍हा शहरात निश्‍चित झाला की ते यायच्‍या दिवशी जिल्‍ह्यातील बहुतांश वृत्तपत्रांचे रकाने भरुन बातम्‍या प्रसिध्‍द व्‍हायच्‍या. जिल्‍ह्यातील अनेक समस्‍या, प्रश्‍नांकडे त्‍यातून लक्ष वेधले जायचे अन्‌ ‘जावई अजितदादा सासुरवाडीला आज काय देणार’ असा मथळा किंवा उपमथळा हमखास असायचा. दादांच्‍या अचानक जाण्‍याने मात्र यापुढे अशा मथळ्यांनी जिल्‍ह्याती वृत्तपत्रांचे रकाने आता सजणार नाहीत.

साधारणपणे १९९१ ते १९९३ पर्यंत विविध खात्‍यांचे राज्‍यमंत्री असलेल्‍या अजितदादांकडे १९९९ मध्‍ये विलासराव देशमुख यांच्‍या मंत्रीमंडळात कॅबिनेट मंत्री म्‍हणून बढती मिळाली; अन्‌ त्‍या त्‍या खात्‍याचे निर्णय घेण्‍याचे अधिकार त्‍यांच्‍याकडे आले. तेव्‍हापासून अजितदादा जेव्‍हाही केव्‍हा जिल्‍हा दौर्‍यावर असत त्‍या वेळी त्‍यांच्‍या खात्‍याशी संबंधित जिल्‍ह्यातील समस्‍या, प्रश्‍न मांडून पत्रकार मंडळी ‘जावई अजितदादांकडून जिल्‍ह्याला अपेक्षा’ या मथळ्याखाली बातम्‍या प्रसिध्‍द करीत. त्‍याची दखल घेत अजितदादाही मग जाहीर कार्यक्रमातच अशा बातम्‍यांचा संदर्भ देत असत. जावई आहे म्‍हणून भलत्‍या सलत्‍या मागण्‍या मांडू नका. जे नियमाने आहे, योग्‍य आहे ते ती देईनच, असे सांगत शिस्‍तीचा व नियमाचा धडाही देत.

या शिवाय अनेकदा जाहीर कार्यक्रमावेळी राष्‍ट्रवादी काँग्रेसचे स्‍थानिक नेते, पदाधिकारीही भाषणात जिल्‍ह्यासाठी अनेक मागण्‍या मांडायचे अन्‌ जावई असलेल्‍या दादांनी ही मागणी मंजूर करावी, अशी मागणी करायचे. तशा कार्यक्रमातही दादा त्‍या मागण्‍यांचा आवर्जू्न उल्‍लेख करायचे. मागणी अवाजवी असेल तर खुमासदार शैलीत सुनावायचे. पण याबाबत संबंधित विभागाकडून मी अहवाल मागवतो असे सांगून सासुरवाडीला खूशही करायचे. अशा अनेक आठवणींत आज राष्‍ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी हरवून गेले. कालपर्यंत ज्‍या दादांशी आपण फोनवर बोलायचो तेच दादा आज आपल्‍यात नाहीत ही कल्‍पनाच मान्‍य होत नसल्‍याने अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी बुधवारी दिवसभर शोकसागरात बुडाल्‍याचे चित्र होते.

भूम तालुक्‍यातील बाणगंगा व उमरगा तालुक्‍यातील भाऊसाहेब बिराजदार हे दोन साखर कारखाने अजित दादांच्‍या मार्गदर्शनाखाली सुरु होते. त्‍यासाठी अनेकदा भल्‍या पहाटेच अजितदादा कोणताही लवाजमा न घेता या दोन तालुक्‍यात येऊन कारखान्‍याच्‍या कामकाजाचा आढावा घेन जात असत. या दौर्‍याची वाच्‍यताही कुठे होत नसे. या दोन कारखान्‍यांमुळे जिल्‍ह्यातील साखर कारखानदारीत स्‍पर्धा निर्माण झाली अन्‌ ऊस उत्‍पादक शेतकर्‍यांना चांगला दर मिळण्‍यास सुरुवात झाली, अशी आठवण सांगत राष्‍ट्रवादी काँग्रेसचे ज्‍येष्‍ठ नेते, निकटवर्तीय सुरेश बिराजदार यांना अश्रू अनावर झाले. काँग्रेस - राष्‍ट्रवादी आघाडीचे सरकार असताना २३ ऑगस्‍ट २००७ मध्‍ये धाराशिवसाठी कृष्‍णा मराठवाडा सिंचन योजनेला मान्‍यता मिळाली. त्‍या नंतर जलसंपदामंत्री अजितदादांनी ‘माझ्‍या सासुरवाडीला पाणी वेळेत मिळाले पाहिजे’, अशी भूमिका घेत सातत्‍याने निधीची तरतूद करत मराठवाड्यातील दुष्‍काळ हटला पाहिजे या जाणिवेने काम केले. या योजनेंतर्गत रामधरा तलावाचे भूमीपूजन त्‍यांनी केल्‍याची आठवण सुरेश बिराजदार यांनी सांगितली.

तेर सासरवाडी

अजितदादा यांचा विवाह ३० डिसेंबर १९८५ ला सुनेत्रा यांच्‍याशी झाला. त्‍या माजी मंत्री डॉ. पद्‍मसिंह पाटील यांच्‍या भगिनी आहेत. डॉ. पाटील आणि ज्‍येष्‍ठ नेते खा. पवार यांच्‍या मैत्रीतून अजितदादा व सुनेत्राताई यांचे विवाहबंध जुळले नि अजितदादांचे तेर (जि. धाराशिव) या गावाशी कायमचे नाते जोडले गेले. अजितदादांचा मंत्रीमंडळात समावेश झाला की गावात जल्‍लोष, गुलालाची उधळण आणि फटाके हे समीकरण १९९१ पासून २०२४ पर्यंत कायम राहिले. बुधवारची (दि. २८) उजाडलेली सकाळ मात्र वाईट बातमी घेऊन येईल, अशी कल्‍पनाही कोणी केली नाही. विमान अपघातात बारामतीत अजित दादांच्‍या जाण्‍याची बातमी आली अन्‌ सासुरवाडी तेरही शोकसागरात बुडाली. ठिकठिकाणी दादांना श्रध्‍दांजली वाहणार फलक लावण्यात आले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT