Dharashiv News : 'डॉल्बी'चा दणदणाट पडला ४० लाखांना file photo
धाराशिव

Dharashiv News : 'डॉल्बी'चा दणदणाट पडला ४० लाखांना

ध्वनिप्रदूषण केल्याने कारवाई, आरटीओंचाही दणका

पुढारी वृत्तसेवा

Dharashiv Action taken for causing noise pollution by using loud speakers; RTOs also take strict action

धाराशिव, पुढारी वृत्तसेवा :

सार्वजनिक व वैयक्तिक कार्यक्रमांमध्ये डॉल्बी-डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे वाढत चाललेल्या ध्वनी व पर्यावरण प्रदूषणाविरोधात धाराशिव पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. शहरातील चार डॉल्बी-डीजे वाहनांवर तब्बल ४० लाख रुपयांची हमी रक्षण रक्कम तर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून ७४ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

६ जानेवारी २०२६ रोजी हजरत खॉजा शमशोद्दीन गाजी (रहे) यांच्या उरुसानिमित्त धाराशिव शहरात डॉल्बी डीजे लावण्यात आले होते. मात्र ठरवून दिलेल्या ध्वनी मर्यादेपेक्षा अधिक आवाज करण्यात आल्याने संपूर्ण शहरात दणदणाट झाला. त्यामुळे धाराशिव शहर पोलिस ठाण्याने कारवाई करत संबंधित डॉल्बी, साऊंड सिस्टिम व वाहने ताब्यात घेतली.

या कारवाईत प्रणव राजेंद्र तांबे (रा. सातारा), सौरभ सुरेश खामकर (रा. शिरूर, पुणे), गणेश रामदास मिरगी (रा. सातारा), संतोष किसन मेघावत (रा. पुणे), तसेच साऊंड सिस्टिम चालक सागर संभाजी शिंदे (रा. कोल्हापूर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या सर्व वाहनांना दंड आकारण्यात आला आहे.

प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी न्यायालयाने प्रत्येकी १० लाख रुपये अशी एकूण ४० लाख रुपयांच्या हमी रक्षणावर व कडक अटींसह वाहने तात्पुरती सोडण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये डॉल्बी-डीजे व वाहने विक्री, बदल किंवा बेकायदेशीर वापरास मनाई करण्यात आली आहे. आरटीओ कार्यालयाने चारही वाहनांवर एकूण ७४ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक रितू खोखर, अप्पर पोलिस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक कुमार दराडे यांच्या पथकाने केली. या कारवाईमुळे डॉल्बी-डीजेविरोधात कडक संदेश गेला असून शहर डॉल्बीमुक्त होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

कारवाई सातत्य हवे

दरम्यान, पोलिसांनी केलेल्या कारवाईचे पर्यावरणप्रेमीतून स्वागत होत आहे. पोलिसांनी या कारवाईत सातत्य ठेवावे, अशी भावना यातून व्यक्त होत आहे. आता महापुरुषांची जयंती, उत्सव, लग्नसोहळे आदींसाठी डॉल्बीचा वापर होणार आहे. त्यामुळे पोलिसांनी कारवाई सातत्य ठेवण्याची मागणी होऊ लागली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT