लोहारा : तुळजापूर-लातूर राष्ट्रीय महामार्गावर करजखेडा पाटीजवळ रविवारी (दि. १५) दुपारी काळजाचा थरकाप उडवणारा तिहेरी अपघात घडला. भरधाव बोलेरोने दोन कारला दिलेल्या जोरदार धडकेत तिघांचा जागीच मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी एक बोलेरो वाहन भरधाव वेगाने तुळजापूर-लातूर महामार्गावरून जात होते. करजखेडा पाटीजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ही अनियंत्रित बोलेरो समोरून येणाऱ्या वॅगनआर कारला प्रचंड वेगाने धडकली. ही धडक इतकी भीषण होती की, धडकेनंतर बोलेरो हवेत उलटून थेट रस्त्याच्या दुसऱ्या बाजूच्या लेनमध्ये गेली आणि तिथून जाणाऱ्या स्विफ्ट कारवर आदळली.
या विचित्र आणि तिहेरी अपघातात तीनही वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. अपघातातील मृतांची संख्या तीन असून त्यांचा जागीच प्राण गेल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, अन्य चार जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने धाराशिव आणि सोलापूर येथील रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.
अपघातानंतर महामार्गावरील वाहनांच्या रांगा लागल्याने वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून रस्ता मोकळा केला. दरम्यान, मृतांची आणि जखमींची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत. पोलीस पुढील तपास करत असून मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.