तुळजापूर : दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे शुक्रवारी तुळजापूरनगरीत कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड मांदियाळी झाल्याचे दिसून आले. तुळजापुरात भक्तांच्या गर्दीमुळे खासगी वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली असून, शहरातील सर्व रस्ते, वाहनांच्या पार्किंगमुळे व्यापून गेले आहेत.
गर्दी नियंत्रित करण्यासाठी येथे पोलिस बंदोबस्त उपलब्ध नसल्याने सर्वत्र बेशिस्त बोकाळली आहे. बस स्थानकासह मंदिर परिसर व शहरात कुठेही पोलिस यंत्रणा कार्यरत नाही. भाविकांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागत आहे. मंगळवारी दीपावली अमावस्या व पाडव्याच्या निमित्तानेही अशीच गर्दी झाली होती. भाविकांना त्यांची वाहने उभी करण्यासाठी वाहनतळ शोधण्यासाठी तासनंतास वेळ लागत होता.
मुख्य रस्ते वाहनांच्या रांगांनी बंद झाले, मात्र रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी एकही पोलिस कर्मचारी उपस्थित नव्हता. हीच परिस्थिती तुळजा भवानी मंदिरात व मातेच्या महाद्वारात पहावयास मिळाली. मंदिरात दर्शनाला जाण्यासाठी प्रत्येकाची धावपळ असताना मातेच्या महाद्वारात गर्दी आवरायला एकही पोलिस,कर्मचारी-अधिकारी उपस्थित नव्हता.
शाळांना येत्या 2 नोव्हेंबर पर्यंत सुट्टया आहेत. यामुळे आगामी काळात मंदिर प्रशासनाने बंदोबस्तासाठी जादा पोलिस कुमक मागविण्याची गरज आहे. दरम्यान सध्या भाविकांनी दर्शन मंडपाचे सर्व हॉल काही मिनिटात फुल्ल होत आहेत. हॉलबाहेर भाविक प्रतीक्षा रांगेत उभे रहात आहेत. मुख, धर्म,दर्शनाबरोबर स:शुल्क दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी होत आहे. दर्शनाला साधरण दोन ते तीन तासाचा अवधी लागत आहे.