उमरगा शहरात क्रिकेट सट्टेबाजी जोमात, झटपट पैशांच्या हव्यासापोटी तरूण जाळ्यात Pudhari File Photo
धाराशिव

उमरगा शहरात क्रिकेट सट्टेबाजी जोमात, झटपट पैशांच्या हव्यासापोटी तरूण जाळ्यात

या सर्व प्रकारामुळे अनेक कुटुंबातील तरुण आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत.

पुढारी वृत्तसेवा

Cricket Betting Rife in Umarga City; Youth Trapped by the Lure of Quick Money

उमरगा जि. धाराशिव : पुढारी वृत्तसेवा सध्या सर्वत्र आयपीएलची धामधूम सुरू आहे. असे असताना त्याच्या छायेत उमरगा शहरात क्रिकेट सट्टेबाजीचा अवैध धंदा मोठ्या प्रमाणात फोफावत असल्याचे चित्र समोर आले आहे. मुंबई–पुण्यासारख्या महानगरांत सुरू असलेले सट्ट्याचे लोण आता उमरग्यात पोहोचले असून झटपट पैसा कमावण्याच्या हव्यासापोटी हजारो तरुण या जाळ्यात अडकताना दिसत आहेत.

कमी भांडवलात जास्त नफा मिळवण्याच्या मानसिकतेमुळे तरुणांचा कल या अवैध व्यवसायाकडे वाढत आहे. आयपीएल सामन्यातील नाणेफेक ते प्रत्येक चेंडूवर सट्टा लावला जातो. कोणत्या चेंडूवर किती धावा निघतील, चौकार-षटकार, विकेट, पंचांचा निर्णय, पावर प्लेतील धावा, तसेच सामना कोण जिंकणार किंवा ‘मॅन ऑफ द मॅच’ कोण होणार यावर लाखो रुपयांची बोली लावली जाते.

शहराच्या उत्तर भागात चार-पाच ठिकाणी बुकीमार्फत हा सट्टा घेतला जात असल्याची चर्चा असून, निर्जन ठिकाणी बंद खोल्यांत बसून लॅपटॉप व मोबाईलच्या माध्यमातून हा कारभार चालवला जातो. व्यवहारांसाठी कोड भाषा वापरली जात असल्याने हा प्रकार गुप्तपणे सुरू आहे. सट्टेबाज एजंटांनी खेळणारे व लावणारे यांची मोठी साखळी तयार केली आहे. दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत असून दुसऱ्या दिवशी पैशांची वसुली शहरातून केली जाते.

या सर्व प्रकारामुळे अनेक कुटुंबातील तरुण आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत. वाढती बेरोजगारी आणि जलद श्रीमंतीच्या लालसेमुळे हा धोका अधिक वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांना सर्व माहिती असूनही मोठ्या सट्टेबाजांवर ठोस कारवाई होत नसल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिस प्रशासनाने ठोस पावले उचलून सट्टेबाजीच्या मुळावर घाव घालून अवैध साखळीचा भंडाफोड करावा अशी मागणी जोर धरत आहे.

... म्हणून पोलीस कारवाई होत नसावी!

शहराच्या उत्तर भागात तीन ते चार ठिकाणी क्रिकेटवर सट्टा लावला जात आहे. विशेष म्हणजे यात एका लोकप्रतिनिधीचा सहभाग असल्याच्या चर्चा जोर धरत आहेत. संबंधित व्यक्ती नेमकी कोण, यावर उघडपणे कोणी बोलत नसले तरी याला राजकीय आशीर्वादामुळे अभय मिळत असल्याचा संशय व्यक्त होत आहे. तसेच अनेक वर्षांपासून पोलिस ठाण्यातील कार्यकाळ संपल्यानंतर कायम ठाण मांडून बसलेले पोलिस कर्मचारी यांचाही वरदहस्त असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे पोलिस कारवाई करण्यास धजावत नसावेत, अशीही भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.

सट्टा असा लावला जातो!

क्रिकेट सामन्यांवर आता सट्टेबाजी पूर्णपणे डिजिटल झाली असून खास मोबाईल अ‍ॅप्स व व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर ‘रेट’ दिले जातात. प्रत्येक चेंडू, षटक, फलंदाजांच्या धावा, गडी बाद आणि सामन्याच्या निकालावर पैसे लावले जातात. ‘लाईव्ह रेट’ सतत बदलत असल्याने खेळ सुरू असतानाच मोठ्या प्रमाणात पैशांची उलाढाल होते. गुगल पे, फोनपे सारख्या ऑनलाईन व्यवहारांमुळे हा अवैध धंदा अधिकच गुप्तपणे वाढत आहे.

आयपीएल सामन्यांवर सट्टा लावला जात असल्याची ठोस माहिती अद्याप उपलब्ध नाही. मात्र, कोणी सट्टा लावत असल्याचे किंवा सट्टा घेत असल्याचे आढळल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
प्रल्हाद सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक, उमरगा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT