Counting Shaktipeeth suspended at Dharashiv
धाराशिव : पुढारी वृत्तसेवा :
प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांनी गुरुवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक, माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. भूसंपादनासाठी जबरदस्ती केली तर गाठ आमच्याशी आहे, असा इशारा शेट्टी यांनी दिला. त्यानंतर प्रशासनाने तूर्तास ही मोजणी प्रक्रिया स्थगित करण्याचा निर्णय जाहीर केला.
शक्तिपीठ महामार्गामुळे आपली जमीन जाणार असून आपण भूमिहीन होणार असल्याच्या भीतीने शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली ४०० ते ५०० शेतकऱ्यांनी मोजणी सुरू असलेल्या ठिकाणी मोर्चा काढत जोरदार निदर्शने केली. या आंदोलनानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांसोबत शेतकऱ्यांची बैठक पार पडली.
बैठकीत शेट्टी यांनी प्रशासनाला धारेवर धरत शेतकरी हा तुम्हाला अतिरेकी वाटतो का, असा थेट सवाल उपस्थित करत संताप व्यक्त केला. सरकारच्या दडपणाखाली दमनशाही कराल तर गाठ आमच्याशी आहे. तुम्हाला हा रस्ता इतकाच महत्त्वाचा असेल तर समुद्रात बांधतात त्या पद्धतीने पिलर बांधून रस्ता करा.
आमची काहीच हरकत नाही, अशा शब्दांत शेट्टी यांनी अधिकाऱ्यांना सुनावले. त्यानंतर प्रशासनाने आता प्रकल्पग्रस्त १९ गावांतील शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांच्या भावना आणि शंका समजून घेतल्या जातील, असे आश्वासन देण्यात आले, अशी माहिती आंदोलकांनी दिली.
राजू शेट्टी म्हणाले, या महामार्गाचा कोणताही उपयोग शेतकऱ्यांना नाही. फक्त सत्तेची मस्ती दाखवण्यासाठी हा प्रकल्प रेटला जातोय. ही मस्ती उतरवली पाहिजे. आमचे आंदोलन हे भूमिहीन होणाऱ्या शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आहे. आ. बबन लोणीकर यांच्या वक्तव्यावरही त्यांनी सडकून टीका केली.
सध्या रत्नागिरी-नागपूर हा महामार्ग अस्तित्वात असताना राज्य सरकारकडून ८६ हजार कोटींच्या शक्तिपीठ महामार्गाची आवश्यकता नसताना हा प्रकल्प जनतेवर लादला जात आहे. राज्याची आर्थिक परिस्थिती कोलमडली असल्याची गोष्ट वित्त विभागाने सांगितले असतानाही एवढा अट्टाहास ५० हजार कोटीचा ढपला पाडण्यासाठीच होत आहे, असा आरोप करत शेट्टी यांनी जर मोजणी करण्याासाठी शासकीय अधिकारी ड्रोन घेऊन आले तर गोफण तयार ठेवा. ड्रोन गोफणने पाडा, असे आवाहन शेतकऱ्यांना केले.