उमरगा : कारमधून आलेल्या चार हल्लेखोरांनी उमरगा येथील बांधकाम ठेकेदारावर धारदार शस्राने डोक्यावर व हातावर वार केले. या हल्ल्यात बांधकाम ठेकेदार गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गोविंद राम दंडगुले (वय ४०) असे या ठेकेदाराचे नाव आहे. घटना उमरगा शहरात मंगळवारी (दि.१५) दुपारी चारच्या सुमारास घडली. दिवसाढवळ्या घडलेल्या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, उमरगा शहरातील बांधकाम ठेकेदार गोविंद दंडगुले हे मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास बँक कॉलनी येथून राष्ट्रीय महामार्गाने दुचाकीवरून घराकडे निघाले होते. ते आयसीसीआय बँकेजवळ आले असता कारमधून आलेल्या चार हल्लेखोरांनी त्यांना अडवत त्यांच्यावर धारदार शस्राने हल्ला केला. डोक्यावर व हातावर वार केल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर हल्लेखोर कारमधूर पसार झाले. घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या नागरिकांनी दंडगुले यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. सोलापूरच्या एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान पोलिस निरीक्षक अश्विनी भोसले यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. तसेच आमदार प्रवीण स्वामी घटनास्थळी जाऊन या घटनेबाबत पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा केली. हा हल्ला नेमका कोणत्या कारणावरून व कुणी केला? हे अस्पष्ट असून याबाबत पोलिस यंत्रणा तपास करत आहे.
घटनास्थळ्यावरील सीसीटिव्ही कॅमेरे ताब्यात घेण्यात आले आहेत. हल्लेखोराच्या शोधासाठी वेगवेगळी पोलीस पथके तयार करून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे.अश्विनी भोसले, पोलीस निरीक्षक