उमरगा, पुढारी वृत्तसेवा : शहरातील बांधकाम गुत्तेदार यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्या प्रकरणी पोलिसांनी तीन संशयित आरोपींना अटक केली आहे. तर चौथ्या फरार आरोपीचा पोलीस पथक शोध घेत आहे. या प्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौथा आरोपीही लवकरच जेरबंद करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक सदाशिव शेलार व पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
उमरगा पोलीस ठाण्यात शहरातील बांधकाम गुत्तेदार गोविंद दंडगुले यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्या प्रकरणी शनिवारी (दि १९) आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले म्हणाल्या की, शहरातील बांधकाम गुत्तेदार गोविंद राम दंडगुले आणि राहुल रमाकांत परशेट्टी (रा. मुळज, ह. मु. काळे प्लॉट, उमरगा) यांच्यात प्लॉटच्या आर्थिक व्यवहारातून वाद झाला होता. याचा राग मनात धरून परशेट्टी याने मंगळवारी (दि १५) तीन साथीदारांसह धारधार शस्त्राने दंडगुले यांच्यावर हल्ला केला होता. गंभीर जखमी दंडगुले यांच्यावर सोलापूर येथील खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी या गंभीर घटनेची तात्काळ दखल घेऊन तपासाची चक्रे वेगाने फिरवली. गुप्त माहितीवरून रात्रीच्या सुमारास गुन्ह्यातील कारचा पाठलाग करीत कर्नाटक सीमा भागातील खजुरी (ता. आळंद) येथे गुन्ह्यातील ईर्टीगा कारचा टायर फुटल्याने कार पकडली. मात्र अंधाराचा फायदा घेऊन चारही आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले. तरीही रात्रभर सिमावर्ती भाग आणि शेत शिवारात पथकाने शोध मोहीम राबवत परिसर पिंजून काढला. बुधवारी आरोपी कर्नाटकातील बसव कल्याण येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार बसवकल्याण येथील एका हॉटेल मधून राहुल रमाकांत परशेट्टी (रा. मुळज, ह. मु. काळे प्लॉट, उमरगा), शिवा कुकुर्डे (रा. कुन्हाळी), प्रदीप कलशेट्टी (रा. जुनी पेठ, उमरगा) या तिघांना ताब्यात घेतले. तर यातील चौथा फरार आरोपी नवतेज तोरणे (रा. उमरगा) याचा पोलीस पथक शोध घेत आहे.
याप्रकरणी सरकार तर्फे बीट अंमलदार पोलीस हवालदार अतुल जाधव यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून कोयते, कार जप्त करण्यात आली असल्याचीही माहिती पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांनी दिली. तिन्ही आरोपींना शनिवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.