Congress Protest : ज्ञानेश कुमारांना पदावरून त्वरित हटवा ! file photo
धाराशिव

Congress Protest : ज्ञानेश कुमारांना पदावरून त्वरित हटवा !

मतदार यादीतील कथित घोळाच्या निषेधार्थ काँग्रेसची निदर्शन

पुढारी वृत्तसेवा

Congress holds demonstration in protest against alleged irregularities in the electoral roll

धाराशिव, पुढारी वृत्तसेवा : मतदार यादीतील कथित अनियमितता आणि पात्र मतदारांच्या मतदानाच्या अधिकाराशी होणाऱ्या छेडछाडीच्या निषेधार्थ काँग्रेसने धाराशिवमध्ये आक्रमक पवित्रा घेतला. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून त्वरित हटविण्याची मागणी या वेळी करण्यात आली.

काँग्रेसच्या 'मत वाचवा, देश वाचवा' अभियानांतर्गत धाराशिव शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने गुरुवारी (दि. २९) तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. 'मत वाचवा, देश वाचवा', 'वोट चोर, गद्दी चोर' अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडत निवडणूक प्रक्रियेतील कथित अनियमिततेची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी आंदोलकांनी केली.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यकाळातील मतदार यादीतील फेरबदल आणि कथित अनियमिततेवर काँग्रेसने आक्षेप नोंदविला. मतदार यादीतून पात्र नागरिकांची नावे वगळली जात असतील किंवा नवीन नावे समाविष्ट करताना नियमांचे उल्लंघन होत असेल, तर ही बाब लोकशाहीसाठी गंभीर असल्याची भूमिका पक्षाच्या वतीने मांडण्यात आली. प्रत्येक पात्र नागरिकाचा मतदानाचा अधिकार सुरक्षित ठेवणे ही निवडणूक यंत्रणेची जबाबदारी असल्याचे सांगत आंदोलकांनी निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेचा मुद्दा उपस्थित केला.

आंदोलनानंतर धाराशिव तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. मतदार यादीतील कथित अनियमिततेची स्वतंत्र, निष्पक्ष आणि सखोल चौकशी करावी, पात्र मतदारांची नावे वगळण्याच्या तसेच नवीन नावे समाविष्ट करण्याच्या प्रक्रियेची पडताळणी करावी, अशी मागणी करण्यात आली. चौकशी पूर्ण होईपर्यंत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून दूर करण्याबाबत सक्षम प्राधिकरणाने आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली.

मतदार यादी हा लोकशाहीचा कणा असून, त्यातील त्रुटींमुळे कोणत्याही पात्र नागरिकाला मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहावे लागू नये, अशी भूमिका काँग्रेसने मांडली. मतदारांच्या तक्रारींची वस्तुनिष्ठ चौकशी करून निवडणूक प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास कायम ठेवण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या आंदोलनात उमेश राजे निंबाळकर, प्रशांत पाटील, विनोद वीर, धनंजय राऊत, शीला उंबरे, खलील सय्यद, अजित शेळके, अनिवेश शिंदे, शिवाजी गायकवाड आणि सरफराज काजी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT