परंडा (जि. धाराशिव) येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर टीका केली.  Pudhari News Network
धाराशिव

'लाडकी बहीण योजना' सुपरहिट ठरल्याने सावत्र भावांना पोटशूळ : मुख्यमंत्री

पुढारी वृत्तसेवा

धाराशिव, पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री पदापेक्षा भाऊ हा शब्द मला जिव्हाळ्याचा वाटतो. अतिशय उत्साहाने सहभागी झालेल्या लाडक्या बहिणींच्या डोळ्यातील आनंद पाहून लाडकी बहीण ही योजना ‘सुपरहिट’ ठरल्याचे स्पष्ट होत असल्याची भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी व्यक्त केली. या योजनेत खोडा घालणाऱ्या 'सावत्र भावांना' धडा शिकवा, असे सांगत विरोधकांचा समाचार घेतला. परंडा (जि. धाराशिव) येथे आज (दि.१४) महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' वचनपूर्ती कार्यक्रमात ते बोलत होते.

पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत, आ. ज्ञानराज चौगुले, माजी आ.  सुजितसिंह ठाकूर, जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव, प्रा. शिवाजी सावंत, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती. (Eknath Shinde)

लाडकी बहीण योजना सुरु केल्यानंतर अनेकांनी याविषयी शंका उपस्थित केल्याचे सांगून मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की, महिला सक्षम तर देश सक्षम हे ब्रीद लक्षात घेवून राज्य शासनाने ही योजना प्रभावीपणे राबविली. या योजनेतून लाडक्या बहिणींच्या खात्यावर रक्कम जमा झाली असून त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद, त्यांच्याकडून मिळणारे प्रेम पाहिल्यानंतर मनाला समाधान मिळत आहे. या योजनेसह शासनाच्या इतरही योजना यापुढेही सुरु राहतील. भविष्यात या योजनेचा लाभ टप्प्या-टप्प्याने वाढविणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महिलांसाठी एसटी प्रवासात ५० टक्के सवलत दिल्यानंतर तोट्यातील एसटी महामंडळ नफ्यात आले. त्याचप्रमाणे आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळेही राज्य शासनाच्या अर्थव्यवस्थेला नुकसान न होता चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमस्थळी प्रवेश केला. यावेळी अनेक बहिणींनी त्यांना राखी बांधली. श्री तुळजाभवानी देवीची प्रतिमा आणि कवड्याची माळ, श्री विठ्ठल मूर्ती, वीणा व घोंगडी देवून यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला महिलांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती. 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT