येरमाळा : महाकाली कला केंद्राला सील ठोकताना महसूल व पोलिस पथक. pudhari photo
धाराशिव

Dharashiv Crime : महाकाली कला केंद्र अखेर सील

जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई, अनेक दिवसांपासून होती चर्चा

पुढारी वृत्तसेवा

रत्नापूर : कळंब तालुक्यातील चोराखळी येथील वादग्रस्त महाकाली कला केंद्राचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आल्यानंतर जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या आदेशानुसार संबंधित केंद्र सील करण्याची कारवाई करण्यात आली. महसूल व पोलिस विभागाच्या संयुक्त पथकाने ही मोहीम राबवून केंद्रातील सर्व खोल्या तसेच मुख्य प्रवेशद्वाराला टाळे ठोकत पंचनामा केला.

हत्या, गोळीबार आणि हाणामारीसारख्या गंभीर घटनांमुळे हे केंद्र वारंवार चर्चेत आले होते. पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनीही या प्रकरणात ठोस भूमिका घेत कारवाईचे निर्देश दिले होते. नियमांचे वारंवार उल्लंघन, दाखल गुन्हे आणि भांडणांच्या घटनांचा सविस्तर अहवाल जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, अपर जिल्हा दंडाधिकारी विद्याचरण कडवकर आणि तहसीलदार हेमंत ढोकळे यांनी न्यायालयात सादर केला होता.

पोलिस अधीक्षक रितु खोखर यांनी केंद्र सील करण्याचा प्रस्ताव दिल्यानंतर प्रशासनाने तातडीने कारवाई केली. येरमाळा मंडळ अधिकारी एन. डी. नागटिळक, सहायक पोलिस निरीक्षक तात्याराव भालेराव, पोलिस हवालदार किरण शिंदे व महमद सय्यद यांनी प्रत्यक्ष कारवाईत सहभाग घेतला. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती उठवल्यानंतर प्रशासनाने तत्काळ हालचाल केली.

कला केंद्राचे मालक राजाभाऊ सीताराम माळी यांनी दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्यांनी ती मागे घेतली. न्यायमूर्ती वैशाली पाटील जाधव आणि नितीन सूर्यवंशी यांच्या खंडपीठाने याबाबत आदेश दिले, तर सरकारी बाजू ॲड. पी. के. लखोटीया यांनी मांडली. तपासात असेही आढळून आले की, पारंपरिक कार्यक्रमांऐवजी साउंड सिस्टीमवर नृत्य सादर केले जात होते. इमारतीसाठी आवश्यक परवानग्या, स्वतंत्र प्रवेश-निर्गम मार्ग, रंगमंच आणि प्रेक्षकांसाठी बसण्याची योग्य व्यवस्था नसल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT