Childhood lost in the mobile screen
दादासाहेब लगाडे
वाशी : 'शाळा सुटली, पाटी फुटली' म्हणत मैदानाकडे धाव घेणारे बालपण आता चार भिंतींत मोबाईलच्या छोट्याशा पडद्यावर बंदिस्त झाले आहे. पूर्वी वाशी तालुक्यातील गावोगावी शाळा सुटल्यानंतर पारावर, चौकात आणि मोकळ्या मैदानात कबड्डी, खो-खो, विटी-दांडू, सुरपारंब्या, चोरा-पोलीस, आंधळी कोशिंबीर, पतंग उडविण्यासह पारंपरिक खेळांची धूम असायची. आता ही मैदाने ओस पडत असून मुले मोबाईलवरील खेळ आणि समाजमाध्यमांच्या आहारी जात असल्याचे चित्र आहे.
शाळेतून घरी आल्यानंतर अनेक मुले आई-वडिलांचा मोबाईल घेऊन ऑनलाइन खेळ, समाजमाध्यमांवरील चित्रफिती पाहण्यात तासन्तास रमून जातात. त्यामुळे शारीरिक हालचाल कमी होऊन लठ्ठपणा, चिडचिडेपणा, अभ्यासात लक्ष न लागणे आणि एकलकोंडेपणा वाढत आहे. सतत पडद्याकडे पाहिल्याने डोळे कोरडे पडणे, जळजळ, लाल होणे आणि दृष्टी कमजोर होण्यासारख्या समस्याही निर्माण होत आहेत. पालकही मुलांना शांत ठेवण्यासाठी किंवा जेवण घालण्यासाठी मोबाईल देत आहेत.
माझा मुलगा शिवांश मोरे अडीच वर्षांचा आहे. तो सतत मोबाईल पाहतो. जेवताना मोबाईल दिला तरच जेवतो. आमच्या कुटुंबात सर्वजण मराठी बोलतात; मात्र मोबाईलमुळे तो आम्हाला हिंदीत बोलतो."अमोल बाळासाहेब मोरे, पालक, दसमेगाव
मुलांचे आरोग्य आणि क्रीडासंस्कृती जपण्यासाठी शाळा, पालक व सामाजिक संस्थांनी पारंपरिक खेळांचे सामने आयोजित करावेत. वेळीच उपाययोजना न केल्यास मोबाईलचे व्यसन भावी पिढीच्या विकासात अडथळा ठरेल.' -एस. एल. पवार, सेवानिवृत्त क्रीडा शिक्षक