उमरगा : महायुतीच्या सरकारने अनेक लोककल्याणकारी योजना कार्यान्वित करून महाविकास आघाडीने खोडा घातलेली कामे केली. सरकारने अनेक जनहिताच्या योजना आणल्या असून १२४ सिंचन प्रकल्पाला मान्यता दिली आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यात हप्ते भरणारे आमचं सरकार असून यापूर्वीचे सरकार हे हप्ते घेणारे होते, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (दि.८) धाराशिवमधील सभेत केली.
धाराशिव जिल्ह्यातील उमरगा विधानसभा निवडणुकीतील महायुतीचे उमेदवार आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी (दि ०८) प्रचार सभेत मुख्यमंत्री शिंदे यांनी महाविकास आघाडीचा चांगलाच समाचार घेतला. यावेळी माजी खासदार प्रा रविंद्र गायकवाड, आमदार ज्ञानराज चौगुले, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार, जिल्हा बँकचे चेअरमन बापुराव पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती जितेंद्र शिंदे, युवा सेनेचे मराठवाडा निरिक्षक किरण गायकवाड, जिल्हा परिषदेचे माजी सभापती अभय चालुक्य, भाजपचे चंद्रकांत महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना शिंदे म्हणाले, महायुतीच्या सरकारने जनहिताच्या योजना आणल्या. लाडकी बहीण, लाडके भाऊ, कामगार, शेतकरी आणि ज्येष्ठ नागरिकांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. यापुर्वीच्या मुख्यमंत्र्याच्या वर्षा निवासस्थानाची दारे बंद असायची. ते मंत्री, आमदार कोणालाही भेटायचे नाहीत. मात्र मी मुख्यमंत्री झाल्यानंतर फक्त सव्वा दोन वर्षात सर्वसामान्य गोर-गरीब जनतेसाठी अनेक योजना आणि कामे केली आहेत. काँग्रेसने राज्यस्थान, हिमाचल प्रदेश, कर्नाटक निवडणुकीत अनेक योजना घोषित केल्या, मात्र सरकार येताच पैसा ईल्ला (नाही) हा कानडी भाषेतील शब्द वापरून टोला लगावला. यावेळी उपस्थितांमध्ये जोरदार हशा पिकला.
त्यानंतर त्यांनी महायुतीच्या दहा कलमी वचननाम्यात शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतकरी सन्मान योजना १५ हजार रुपये, लाडक्या बहिणीला १,५०० वरून २,१०० रुपये, प्रत्येकाला अन्न आणि निवारा, वृद्ध पेन्शन योजना १,५०० वरून २,१०० रुपये देण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगत "ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है," असे म्हटले. तत्पूर्वी लाडक्या बहिणीच्या हस्ते मुख्यमंत्री शिंदे यांचे औक्षण करण्यात आले.
यावेळी आमदार चौगुले, गायकवाड, चालुक्य आदीची भाषणे झाली. सभेसाठी महिला, नागरिक, महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या गर्दीने संपूर्ण मैदान भरल्याने अनेकांना सभास्थळी जागाच मिळाली नाही. त्यामुळे अनेकांना महामार्गालगत उभे राहून सभा ऐकावी लागली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उबाठा शिवसेनेचे विलास व्हटकर, माजी पंचायत समिती सदस्य विष्णू पाटील, क्रांती व्हटकर यांच्यासह अनेकांनी शिवसेनेत प्रवेश केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत असताना शिवसैनिकांनी आमदार ज्ञानराज चौगुलेंना मंत्रीपद देण्याची मागणी केली. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी मी काही गोष्टी बोलत नसतो पण करून दाखवतो असे स्पष्ट करत आमदार चौगुले यांना २० तारखेला मतदान करून जास्त मताने निवडून दिल्यास त्यांना लाल दिवा नक्की देणार असल्याचे सांगून येत्या २३ तारखेला उमरगा येथे विजयी फटाके फोडण्यासाठी येणार असल्याचा शब्द दिला. तर ज्ञानराज हा भरवशाचा फलंदाज आहे. आणि यावेळी तो विरोधकाचा चेंडू सीमापार मारणार असल्याचे शेवटी सांगितले.