भूम : अवकाळी पावसामुळे बसस्थानकात प्रवाशांना कसरत करावी लागली. pudhari photo
धाराशिव

Unseasonal rain storm : अवकाळी पावसाने भूमच्या शेतकरी, व्यापाऱ्यांचे नुकसान

नेक ठिकाणी माल भिजल्याने नुकसान झाल्याचे चित्र

पुढारी वृत्तसेवा

भूम : भूम शहरात गुरुवारी दुपारी सुमारे चारच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह सुमारे अर्धा तास कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे आठवडी बाजार अक्षरशः विस्कळीत झाला असून व्यापारी, शेतकरी व नागरिकांची मोठी तारांबळ उडाली.

गुरुवारी आठवडी बाजार असल्याने शहर परिसरात मोठी गर्दी होती. अचानक काळे ढग दाटून येत वादळी वाऱ्यांसह पावसाला सुरुवात होताच बाजारातील व्यापारी, ग्राहक व शेतकरी यांची एकच धावपळ उडाली. भाजीपाला, कडधान्ये व इतर माल भिजू नये म्हणून व्यापाऱ्यांनी तातडीने ताडपत्री व प्लास्टिक आच्छादन टाकत माल वाचवण्याची धडपड केली. अनेक ठिकाणी माल भिजल्याने नुकसान झाल्याचे चित्र दिसून आले.

पावसामुळे बाजारात आलेल्या ग्रामीण भागातील नागरिकांचीही मोठी गैरसोय झाली. एसटी स्टँड परिसरात नागरिक पावसापासून बचावासाठी थांबून राहिले. गावाकडे जाणाऱ्या एसटी बसमध्ये चढताना अनेक प्रवासी पावसात भिजत असल्याचे दृश्य पाहायला मिळाले. तालुक्यात सध्या ज्वारी काढणीचा हंगाम सुरू असून अनेक शेतकऱ्यांनी शेतात ज्वारी मळणी करून ठेवली होती.

अचानक झालेल्या पावसामुळे शेतातील ज्वारी भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. कष्टाने उभे केलेले पीक अवकाळी पावसामुळे खराब झाल्याने शेतकरी चिंतेत पडले आहेत. गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उन्हाच्या तीव्रतेमुळे नागरिक हैराण झाले होते. या पावसामुळे उकाड्यातून काही प्रमाणात दिलासा मिळाला असला, तरी शेतकरी व व्यापाऱ्यांच्या नुकसानीमुळे आनंदावर विरजण पडल्याची भावना व्यक्त होत आहे. पावसामुळे बाजारातील गोंधळ व धावपळ दिवसभर चर्चेचा विषय ठरली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT