भूम : पवनचक्कीच्या वादातून फिर्यादीला लोखंडी रॉडने बेदम मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असलेल्या मुख्य आरोपीला भूम पोलिसांनी लोणावळा येथून अटक केली.
सचिन ऊर्फ भय्या बबन जानकर (वय ३१, रा. सुकटा, ता. भूम) असे आरोपीचे नाव आहे. वाढदिवस साजरा करण्यासाठी तो लोणावळ्यात येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती.भूम पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.
तत्कालीन तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक बळीराम बंदखडके यांनी तपास पूर्ण करून अन्य निष्पन्न आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. मात्र, मुख्य आरोपी सचिन जानकर गुन्हा घडल्यापासून फरार होता.
परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक तथा भूम पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अमोल मोहिते यांना आरोपी वाढदिवसाच्या पार्टीसाठी लोणावळ्यात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार भूम पोलिसांच्या पथकाने लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या मदतीने सापळा रचून त्याला रात्रीच्या सुमारास ताब्यात घेतले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी, भूम यांच्या मार्गदर्शनाखाली अमोल मोहिते, पोलीस उपनिरीक्षक बर्डे, पोलीस अंमलदार अमोल कवडे आणि जयराम क्षीरसागर यांच्या पथकाने लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या सहकार्याने केली.
पुणे, धाराशिव जिल्ह्यांत गुन्हे दाखल
अटक करण्यात आलेल्या जानकरविरुद्ध पुणे जिल्ह्यातील वाकड, दिघी आणि हिंजवडी तसेच भूम पोलिस ठाण्यात यापूर्वी विविध गुन्हे दाखल आहेत. यामध्ये मारहाण, गंभीर दुखापत, अपहरण, शस्त्र अधिनियम आणि मुंबई पोलिस कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यांचा समावेश आहे.