भूम : डिझेल मिळवण्यासाठी भूम येथील पेट्रोल पंपांवर लागलेल्या वाहनांच्या लांबच लांब रांगा. pudhari photo
धाराशिव

Bhoom petrol diesel shortage : भूममध्ये डिझेल-पेट्रोल टंचाई तीव्र

पंपांवर रांगा, शेती-वाहतुकीवर परिणाम; तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

भूम : शहरात डिझेल व पेट्रोल टंचाईचे गंभीर संकट निर्माण झाले असून शहरातील पाचपैकी तीन पेट्रोल पंपांवरील इंधन पुरवठा पूर्णपणे ठप्प झाला आहे. उर्वरित पंपांवर मर्यादित साठा उपलब्ध असल्याने सर्व वाहनचालकांना इंधन मिळावे या उद्देशाने प्रशासनाने प्रति वाहन केवळ 1 हजार रुपयांपर्यंत डिझेल देण्याचा निर्णय घेतला आहे. ऐन उन्हाळ्यात निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे वाहतूक, शेती व मालवाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे.

डिझेल मिळवण्यासाठी शहरातील पेट्रोल पंपांवर सकाळपासूनच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसत आहे. दुचाकी, चारचाकी, ट्रक, ट्रॅक्टर चालक तासन्तास प्रतीक्षा करत असून गर्दी नियंत्रणासाठी पंप प्रशासनाला विशेष व्यवस्था करावी लागत आहे. शहरातील व ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये इंधन मिळेल की नाही, याबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे नागरिक मोठ्या संख्येने पंपांकडे धाव घेत असून परिस्थिती अधिकच तणावपूर्ण बनली आहे.

सकाळी सुरू झालेला इंधन साठा दुपारपर्यंत संपत असल्याने पुढील पुरवठा येईपर्यंत पंप बंद ठेवण्याची वेळ येत आहे. शहरातील दोन खाजगी पेट्रोल पंपांवरील डिझेल साठा पूर्णतः संपल्याने विक्री बंद करण्यात आली आहे. तर आणखी एका पंपावर मुख्य कंपनीकडून पुरवठा साखळी खंडित झाल्याने इंधन वितरण थांबले आहे. सध्या भारत पेट्रोलियम व हिंदुस्तान पेट्रोलियमचे दोन प्रमुख पंपच सुरू असून येथेही साठा अत्यल्प असल्याने प्रति वाहन 1 हजार रुपयांची मर्यादा लागू करण्यात आली आहे.

शहरासोबतच शेजारील बीड व नगर जिल्ह्यातील वाहनचालकही डिझेलच्या शोधात भूमकडे येत असल्याने स्थानिक पंपांवर अतिरिक्त ताण निर्माण झाला आहे. चार दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अवघे सुमारे 6 हजार लिटर डिझेल उपलब्ध होत असल्याने मागणी व पुरवठ्यात मोठी तफावत निर्माण झाली आहे.

डिझेलअभावी ट्रॅक्टर, पंपसेट व शेती अवजारे बंद पडली असून पेरणीपूर्व मशागत ठप्प झाली आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला असून ग्रामीण अर्थचक्रावरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिक व वाहनचालकांनी तातडीने इंधन पुरवठा सुरळीत करण्याची मागणी प्रशासन व तेल कंपन्यांकडे केली आहे.

चार दिवसांत केवळ सहा हजार लिटर डिझेल

भूममध्ये गेल्या चार दिवसांत अवघे सहा हजार लिटर डिझेल उपलब्ध झाले आहे. मर्यादित साठा सर्व नागरिकांना मिळावा व प्रत्येकाची किमान गरज भागावी यासाठी प्रति वाहन एक हजार रुपयांची मर्यादा निश्चित करण्यात आली असून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन भारत पेट्रोलियमचे पंप व्यवस्थापक नितीन क्षीरसागर यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT