Illegal Liquor Stock pudhari photo
धाराशिव

Dharashiv Crime : परंडा तालुक्‍यात गोवा बनावटीच्‍या दारूचा साठा जप्‍त

कारवाईत सात लाख ९२ हजार रुपये किमतीचा मद्यसाठा हस्तगत

पुढारी वृत्तसेवा

भूम : परंडा तालुक्यातील चिंचपूर (बु., जि. धाराशिव) येथे तलावाशेजारील शेतात लपवून ठेवलेला मद्यसाठा राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकून जप्त केला. या कारवाईत सात लाख ९२ हजार रुपये किमतीचा मद्यसाठा हस्तगत करण्यात आला. यात देशी दारू तसेच व्‍हिस्‍कीचे १८४ बॉक्स आहेत. या मद्यसाठ्यामागे नेमके कोण आहे, तो कुठून आणला आणि त्याची विक्री कुठे केली जाणार होती, याचा तपास सुरू आहे.

कारवाईनंतर संबंधित आरोपी फरार असून, त्यांचा शोध घेतला जात आहे. महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधित असलेल्या गोवा बनावटीच्या मद्याची साठवणूक करण्यात आल्याची गोपनीय माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भूम येथील पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने चिंचपूर (बु.) येथील तलावाशेजारील शेतात छापा टाकला. या वेळी मोठ्या प्रमाणात मद्यसाठा आढळून आला.

पथकाने संपूर्ण साठा जप्त केला.हजारो सीलबंद बाटल्याजप्त केलेल्या साठ्यात ९० मिलिलिटर क्षमतेच्या देशी दारूच्या १७ हजार ७०० सीलबंद बाटल्या आहेत. त्या १७७ बॉक्समध्ये ठेवण्यात आल्या होत्या. याशिवाय १८० मिलिलिटर क्षमतेच्या ‘रॉयल स्टॅग’ व्हिस्कीच्या ३३६ बाटल्या, म्हणजेच सात बॉक्स जप्त करण्यात आले. या संपूर्ण साठ्याची किंमत सात लाख ९२ हजार रुपये असल्याचे उत्पादन शुल्क विभागाने सांगितले.

मद्यसाठ्याचा मालक कोण?शेतात एवढ्या मोठ्या प्रमाणात मद्यसाठा कोणी आणून ठेवला, त्याची वाहतूक कोणी केली आणि त्याचा पुरवठा कोणाला केला जाणार होता, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मद्याचा स्रोत, वाहतूक व्यवस्था आणि या प्रकरणातील संभाव्य सहभागींचा शोध घेण्याचे आव्हान विभागासमोर आहे. छाप्यानंतर आरोपी फरार असल्याने तपासाला महत्त्व आले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे धाराशिवचे अधीक्षक हर्षवर्धन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. भूमचे निरीक्षक एच. बी. लांडे, दुय्यम निरीक्षक बी. ए. राख व वाय. ए. कस्तुरे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक ए. बी. कोरे तसेच जवान ए. एन. कोळी, ए. एच. गवारी आणि आर. आर. कदम यांनी या मोहिमेत सहभाग घेतला. पुढील तपास दुय्यम निरीक्षक बी. ए. राख करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT