Bhoom Accident News
भूम : भूम-नगर रोडवर बार्शी तालुक्यातील बीवी गावाजवळील भालेराव वस्ती येथे मंगळवारी (दि.१७) रात्री उशिरा एसटी बस आणि आयशर टेम्पो यांच्यात झालेल्या भीषण समोरासमोर धडकेत टेम्पोचालकाचा जागीच मृत्यू झाला, तर एसटी बसमधील एक तांत्रिक कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. या अपघातात अन्य दोघे किरकोळ जखमी झाले आहेत.
या दुर्दैवी घटनेत आयशर टेम्पोचालक गणेश मधुकर मगर (वय २२, रा. कन्हेरी, ता. वाशी, जि. धाराशिव) हा जागीच ठार झाला. एसटी बसमधील तांत्रिक कर्मचारी सतीश दिवटे हे गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने बार्शी येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. बसमधील अन्य दोन तांत्रिक कर्मचारी, कृष्णा शेटे व स्वप्नील सरवदे हे किरकोळ जखमी झाले असून, त्यांच्यावरही खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, जामखेड एसटी आगाराची बस (क्रमांक MH 20 BL 2805) दुरुस्त करून तीन तांत्रिक कर्मचारी भूमकडे घेऊन येत होते. त्याचवेळी, भूमहून पुण्याकडे माल भरण्यासाठी निघालेला आयशर टेम्पो (क्रमांक MH 25 AJ 4873) समोरून येत होता. रात्री साधारणतः अकरा वाजण्याच्या सुमारास बीवी गावाजवळील भालेराव वस्ती येथे या दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की, आयशर टेम्पोचा चालक गणेश मगर याचा जागीच मृत्यू झाला. धडकेनंतर एसटी बस रस्त्याच्या कडेला असलेल्या एका झाडावर जाऊन आदळली. अपघातानंतर परिसरात मोठा गोंधळ उडाला आणि मदतीसाठी धावपळ सुरू झाली.
घटनेची माहिती मिळताच एसटी आगाराचे वाहतूक निरीक्षक नागेश गायकवाड, वरिष्ठ लिपिक गणेश वाघमारे, वाहतूक नियंत्रण अधिकारी एम. ए. सानप आणि हेड मेकॅनिक बाजीराव जगदाळे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली व पंचनामा केला. या अपघातामुळे भूम-नगर मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. अति वेग, रस्त्यावरील अपुरा प्रकाश आणि चालकाचा अंदाज चुकल्याने हा अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. संबंधित पोलीस विभाग या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.