बाळराजे आवारे पाटील यांनी तांदुळवाडी येथे आमरण उपोषण सुरू केले आहे. Pudhari
धाराशिव

Balraje Aware Patil Protest | ईव्हीएम हटावसाठी बाळराजे आवारे पाटील यांचे आमरण उपोषण; सहाव्या दिवशी प्रकृती खालावली

Dharashiv Hunger Strike | “ईव्हीएम हटवा, लोकशाही वाचवा” ही मोहीम सुरू

पुढारी वृत्तसेवा

Kalamb EVM Hatao Protest

कळंब : लोकशाहीत निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, विश्वासार्ह आणि सर्वसामान्य मतदारांना समजेल अशी असणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र, ईव्हीएमबाबत निर्माण झालेल्या शंका, तांत्रिक गुंतागुंत आणि विश्वासाच्या अभावामुळे पुन्हा पारंपरिक मतपत्रिकेवर आधारित मतदान पद्धत लागू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

याच पार्श्वभूमीवर “ईव्हीएम हटवा, लोकशाही वाचवा” ही मोहीम सुरू करत धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष बाळराजे आवारे पाटील यांनी कळंब तालुक्यातील तांदुळवाडी येथे आमरण उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाचा आज सहावा दिवस असून, उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली आहे.

बाळराजे आवारे पाटील यांच्यासह तांदुळवाडीतील नागरिक ईव्हीएम हटवून मतपत्रिकेच्या पद्धतीने निवडणुका घ्याव्यात, या मागणीसाठी उपोषणावर बसले आहेत. मात्र निवडणूक आयोगाने अद्याप या मागणीची दखल न घेतल्याने आंदोलकांमध्ये नाराजी आहे. मंगळवारी (ता. २१) काँग्रेसचे माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. तसेच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी दूरध्वनीद्वारे समर्थन दिल्याची माहिती अ‍ॅड. प्रणित डिकले यांनी दिली.

आंदोलकांचे म्हणणे आहे की मतदान ही लोकशाहीची आत्मा असली तरी ईव्हीएममुळे मतदारांच्या मनात संशय निर्माण झाला आहे. यंत्रांमध्ये छेडछाड होऊ शकते का, मत खरोखरच योग्य उमेदवारालाच जाते का, निकाल प्रक्रियेत पुरेशी पारदर्शकता आहे का, असे प्रश्न वारंवार उपस्थित होत आहेत. अनेक देशांनी ईव्हीएम प्रणाली नाकारून पुन्हा मतपत्रिकेचा स्वीकार केला असताना भारतात मात्र ईव्हीएमवर ठाम विश्वास ठेवला जात असल्याने संशय अधिक बळावत असल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे.

लोकांचा विश्वास नसलेली कोणतीही निवडणूक प्रक्रिया लोकशाहीसाठी घातक ठरते. “मतदान पारदर्शक, विश्वासार्ह आणि सर्वमान्य नसेल, तर लोकशाही केवळ कागदावरच उरेल,” असा इशारा देत आंदोलकांनी ईव्हीएमऐवजी मतपत्रिका पद्धत पुन्हा लागू करावी, स्वतंत्र व निष्पक्ष तपास यंत्रणा नेमावी आणि संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखावी, अशी ठाम मागणी केली आहे.

ईव्हीएमवरील संशय दूर न झाल्यास देशातील लोकशाहीची मुळेच कमकुवत होतील, असा इशारा देत सरकार व निवडणूक आयोगाने तातडीने ठोस निर्णय घ्यावा, असे आवाहन आंदोलनकर्त्यांनी केले आहे. मागण्या मान्य न झाल्यास “ईव्हीएम हटवा, लोकशाही वाचवा” हा आवाज आणखी तीव्र केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आज मुंबईतील निवडणूक आयोगाच्या कार्यालयात झालेली तोडफोड ही सध्या मी ईव्हीएमविरोधात करत असलेल्या उपोषणाच्या समर्थनार्थ आहे. त्याची जबाबदारी आम्ही स्वीकारत आहोत.
बाळराजे आवारे पाटील, संस्थापक अध्यक्ष, छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT