Awareness is needed to protect against cybercrime
उमरगा पुढारी वृत्तसेवाः दिवसेंदिवस सायबर क्राईमच्या घटना वाढत आहेत, त्या टाळण्यासाठी सजगता आवश्यक असल्याचे प्रतिपादन पोलिस निरीक्षक प्रल्हाद सुर्यवंशी यांनी केले. शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात समाजशास्त्र विभागाच्या वतीने शुक्रवारी, (दि १३) सायबर क्राईम याविषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
पोलीस निरीक्षक प्रल्हाद सुर्यवंशी यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ संजय अस्वले होते. यावेळी उपप्राचार्य डॉ विलास इंगळे, डॉ पद्माकर पिटले, समाजशास्त्र विभागप्रमुख डॉ प्रदीप पाटील, डॉ ज्ञानोबा पडोळे उपस्थित होते. कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात पोलीस निरीक्षक सुर्यवंशी सायबर क्राईम विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, इंटरनेट, संगणक, मोबाईल किंवा डिजिटल उपकरणाचा बेकायदेशीर वापर म्हणजे सायबर क्राईम आहे.
सध्याच्या डिजिटल युगात ऑनलाईन व्यवहार वाढले आहेत. मात्र अनेकजण याविषयी अज्ञान आहेत. डिजिटल युगात सायबर क्राईमची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. मोबाईल, इंटरनेट आणि सोशल मीडियाचा वापर करताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. अन ोळखी व्यक्तींना ओटीपी, बँक खाते क्रमांक, एटीएम पिन किंवा वैयक्तिक माहिती देऊ नये. संशयास्पद लिंक, मेसेज किंवा कॉलवर विश्वास ठेवू नये.
सोशल मीडियावर अनोळखी फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारताना सावध राहावे. मजबूत पासवर्ड वापरून वेळोवेळी बदलणेही महत्त्वाचे आहे. आर्थिक फसवणूक किंवा ऑनलाइन छळ झाल्यास त्वरित पोलीसांकडे तक्रार करावी.
सजगता आणि सतर्कता हीच सायबर गुन्ह्यांपासून बचावाची सर्वात प्रभावी उपाययोजना असल्याचे सांगून व्हॉट्सअँप इन्स्टाग्राम, फेसबुकच्या माध्यमातून मुलीची कशी फसवणूक केली जाते याची उदाहरणे दिली. दुसऱ्या सत्रात डॉ रेवते आणि डॉ सुरवसे यांनी हॅकिंग, फिशिंग, सायबर बुलिंग आणि मालवेअर हल्ला याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सैफ इनामदार यांनी केले. सुत्रसंचालन कु अनिषा सुरवसे यांनी केले. डॉ सुमेध राजूरकर यांनी आभार केले. कार्यशाळेला प्राध्यापकासह विद्यार्थी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.