Ashwin Purnima festival end today
तुळजापूर, पुढारी वृत्तसेवा : तुळजाभवानी देवीच्या अश्विन पौर्णिमा उत्सवाची सोमवारी (दि. २६) सांगता होणार आहे. पहाटे देवीची सिंहासनावर प्रतिष्ठापना झाल्यानंतर पंचामृत अभिषेक पूजा आणि सकाळी सहा वाजता नित्योपचार अभिषेक पूजेला प्रारंभ होईल. लाखो भाविक यासाठी दाखल झाले आहेत.
दुपारी सोलापूरच्या शिवलाड तेली समाजाच्या मानाच्या काठ्यांचे तुळजापुरात आगमन होणार असून, रात्री उशिरा छबिना मिरवणूक काढण्यात येईल. महंतांच्या जोगव्यानंतर उत्सवाची सांगता होईल. नवरात्र महोत्सवाचा दुसरा टप्पा २५ ते २७ ऑक्टोबरदरम्यान साजरा होत आहे.
सीमोल्लंघन सोहळ्यानंतर देवी नगरच्या पलंगावर श्रमनिद्रेसाठी विसावली होती. अश्विन पौर्णिमेनिमित्त सोमवारी पहाटे देवी पुन्हा सिंहासनावर विराजमान होणार असून, धार्मिक विधींनंतर मानाच्या काठ्यांचे आगमन आणि छबिना मिरवणूक हे उत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.