An auto-rickshaw driver from Kanegaon was felicitated in Kolhapur
धाराशिव, पुढारी वृत्तसेवा चुकून खात्यावर आलेली एक लाख रुपयांची रक्कम प्रामाणिक रिक्षाचालकाने परत केली. या रिक्षाचालकाचे नाव लहू अभिमान कांबळे असे असून ते जिल्ह्यातील कानेगावचे (ता. लोहारा) मूळ रहिवासी आहेत. ते कोल्हापुरात रिक्षाचालक आहेत. त्यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल कोल्हापूरचे अप्पर अप्पर पोलिस अधीक्षक धीरजकुमार यांनी त्यांचा सत्कार केला.
कोल्हापुरातील बांधकाम कंत्राटदार लक्ष्मण शिंदे हे जीएसटी भरण्यासाठी एक लाख रुपयांची रक्कम जमा करत असताना चुकीच्या क्रमांकावर पैसे ट्रान्सफर झाले. पैसे दुसऱ्याच खात्यावर गेल्याचे लक्षात येताच शिंदे यांची चिंता वाढली. दरम्यान, संबंधित खातेदार रिक्षाचालक लहू कांबळे (रा. विचारेमाळ, कोल्हापूर, मूळ रा. कानेगाव, जि. धाराशिव) यांच्याशी संपर्क साधण्यात आला. वास्तविक रिक्षाचालक लहू यांना खात्यावर आ-लेली रक्कमही माहिती नव्हती. त्यांनी खाते तपासले असता त्यावर चुकून आलेली रक्कम तत्काळ परत करत कोणताही गैरफायदा न घेता प्रामाणिकपणाचे उदाहरण समाजासमोर ठेवले.
यानंतर सहायक निरीक्षक रणजित पाटील, अंमलदार मिलिंद मलई यांच्यासह पोलिसांनी या प्रामाणिक कृतीची दखल घेतली. कोल्हापूरचे अप्पर पोलिस अधीक्षक धीरजकुमार व शहर उपअधीक्षक प्रिया पाटील यांच्या हस्ते रिक्षाचालक कांबळे यांचा सत्कार करण्यात आला.
जिल्ह्याचे नाव केले
याबाबत लहू कांबळे म्हणाले, की रोजीरोटीसाठी आम्ही आपला जिल्हा सोडून कोल्हापुरात स्थायिक आहोत. इथे काम करत असतानाही प्रामाणिकपणा सोडलेला नाही. माझ्या खात्यावर आलेले एक लाख रुपये मी परत केले. कष्टाने कमावलेल्या पैशांत जे सुख असते ते अशा पैशात नसते.