तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या गेल्या नऊ दिवसांपासून सुरू असलेल्या शारदीय नवरात्रौत्सवाची बुधवारी (दि. 1) दुपारी 12 वाजता मंदिरातील होमकुंडावर पार पडलेल्या अजाबलीच्या धार्मिक विधीनंतर घटोत्थापनाने सांगता झाली. यावेळी ‘आई राजा उदो उदो’,सदानंदीचा उदो उदो...च्या जयघोषाने सारा मंदिर परिसर दणाणून गेला.
आश्विन शुद्ध प्रतिपदा ते महानवमीपर्यंत मंदिर संस्थानने आयोजित केलेले विविध धार्मिक सोहळे, पाच विशेष अवतार महापूजा, छबिना मिरवणुकीचा लाखों श्रद्धाळूंनी लाभ घेतला. खंडे नवमीदिवशी होमकुंडावर अजाबलीचा धार्मिक विधी बुधवारी (दि. 1) महानवमी घरोघरी साजरी होत असताना दुपारी 12 वाजता होमकुंडावर अजाबलीचा धार्मिक विधी रुढी, प्रथा, परंपरेप्रमाणे झाला. या कार्यक्रमानंतर शारदीय नवरात्र महोत्सवाची घटोत्थापनाने सांगता झाली. तहसील कार्यालयाचे शिपाई जीवन वाघमारे यांच्या हस्ते हा धार्मिक विधी पार पडला. यावेळी सिंदफळ येथील गजेंद्र लांडगे यांचे मानाचे बोकड वाजतगाजत मंदिरात आणल्यानंतर त्याची पाळीच्या भोपे पुजार्यांकरवी पूजा करून पुरणपोळीचा नैवेद्य दाकवून ते होम कुंडावर धार्मिक विधीसाठी सोपविण्यात आले.
दरम्यान, मंगळवारी (दि.30) दुर्गाष्टमीनिमित्त दुपारी 1 वाजता उस्मानाबादचे जिल्हाधिकारी तथा तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष डॉ. कीर्ती किरण पुजार हे सपत्नीक शतचंडी होमाच्या यजमानपदी उपस्थित होते. हवन करण्यात आले. 5 तासाच्या वैदिक होमास सायंकाळी 6.10 वाजता पुर्णाहूती देण्यात आली. स्थानिक 151 ब्रम्हवृंदानी पौरोहित्य केले. जिल्हाधिकार्यांना मंदिर संस्थानतर्फे भरपेहराव आहेर देवून सन्मानित केले. होमाला भोपळे, कव्हाळे, श्रीफळाची पूर्णाहुती देण्यात आली. यावेळी महिला व हजारो भाविक उपस्थित होते.
पलंग-पालखीची मिरवणूक
बुधवारच्या उत्तररात्री नगर व भिंगार येथून आलेल्या पलंग-पालखीची शहरातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. ही पलंग-पालखी गुरुवारी पहाटे 4 वाजता तुळजाभवानी मंदिरात पोहचल्यानंतर मातेचा सीमोल्लंघन सोहळा थाटामाटात पार पडला. शुक्रवार पेठेतील जानकोजी भगत (तेली) यांच्या समाधीस्थळापासून पलंग-पालखीच्या मिरवणुक सोहळ्याची संबळाच्या कडकडाटात आणि ‘आई राजा उदो उदो’ च्या जयघोषात सुरुवात झाली. मिरवणूक पहाटे 4 च्या सुमारास मंदिरात पोहचली.
कोजागिरीपर्यंत मातेची मंचकी निद्रा
पालखीत देवीची मुख्य मूर्ती ठेवून मंदिर प्रदक्षिणा आणि मातेचा सीमोल्लंघन सोहळा झाला. त्यानंतर मातेची पाच दिवसाची श्रम निद्रा सुरू झाली. गुरुवारी सायंकाळी शस्त्र पूजन, शमीपूजनाने सार्वत्रिक सीमोल्लंघन पार पडणार आहे. मातेची पाच दिवसीय मंचकी निद्रा कोजागिरी पौर्णिमेपर्यंत सुरू राहणार आहे.