कळंब : शहरात ग्रामीण भागातून शिक्षणासाठी येणार्या विद्यार्थिनींची संख्या मोठी असून त्या बसथांब्यांवर, शाळा-कोचिंग मार्गांवर, वर्दळीच्या ठिकाणी रोडरोमिओंकडून होणार्या मानसिक त्रासाला सामोर्या जात आहेत. यावर तातडीने कारवाई करून अशा टवाळखोरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल हौसलमल यांनी केली आहे.
पोलिस निरीक्षक सानप यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी कळंब शहरातील सावित्रीबाई फुले विद्यालय, विद्याभवन हायस्कूल, जनजागृती विद्यालय, महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय, शिवाजी कॉलेज, रेणुका नर्सिंग कॉलेज, औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), तसेच विविध खासगी शिकवणी वर्गांमध्ये शिकणार्या मुलींना दुचाकीस्वार रोडरोमिओंचा त्रास होत असल्याचे नमूद केले आहे. शाळा व कॉलेज सुटल्यानंतर विशेषतः सकाळी आणि सायंकाळी या विद्यार्थिनी सायकल वा खासगी वाहनांद्वारे घरी परतत असताना त्यांचा पाठलाग केला जातो. रस्त्यावर व चौकात टवाळखोरांचा त्रासही वाढला आहे.
पूर्वी शाळा सुटण्याच्या वेळेस पोलिसांनी गस्त ठेवावी, अशी विनंती काही शाळांनी केली होती. काही दिवस पोलिसांची गस्त सुरू राहिली, परंतु नंतर ती थांबल्याने टवाळखोरांना पुन्हा संधी मिळाल्याचे चित्र आहे. फक्त बाहेरील टवाळखोरच नव्हे तर खासगी शिक्षण संस्था व कोचिंग क्लासेसमधील शिक्षकांचीही चौकशी व्हावी, त्यांची चारित्र्य पडताळणी करूनच त्यांना शिकवण्याची मुभा द्यावी, अशी मागणी निवेदनात केली आहे.
या निवेदनावर राहुल हौसलमल (जिल्हा उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस), अमर गोरे (शहराध्यक्ष, सामाजिक न्याय विभाग) यांच्यासह इतर पदाधिकार्यांच्या स्वाक्षर्या आहेत.