A case has been registered against a fake doctor in Bembli
धाराशिव, पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील बेंबळी येथे बनावट डॉक्टरविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले, की बेंबळी येथील सुधीर मुरलीधरराव झिंगाडे (रा. बेंबळी, ता. जि. धाराशिव)' याने वैद्यकीय व्यवसायासाठी आवश्यक असलेले बॉम्बे नर्सिंग होम अॅक्टचे वैध प्रमाणपत्र नसताना तसेच स्वतःकडे केवळ डीएमएस ही पदवी असतानाही एमबीबीएस असल्याचे भासवून बनावट वैद्यकीय प्रिस्क्रिप्शन तयार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
या तोतयेगिरीमुळे रुईभर (ता. तुळजापूर) येथील आकाश गोरोबा चव्हाण यास गंभीर दुखापत होऊन त्याच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. दि. १ जून २०२५ रोजी बेंबळी येथे आरोपीने निष्काळजीपणे व हयगयीने चुकीचे उपचार करून रुग्णाची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी प्राथमिक आरोग्य केंद्र बेंबळी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल सखाराम पवार (वय २६, रा. पवार निवास, धाराशिव रोड, तुळजापूर) यांनी दि. १७ डिसेंबर रोजी बेंबळी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीच्या तक्रारीवरून बेंबळी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून बेंबळी पोलीस पुढील तपास करीत आहेत.