धाराशिव, पुढारी वृत्तसेवा : शिलाईचे आगावू पैसे देऊनही वेळेत ब्लाऊज शिऊन न दिल्याने ग्राहक मंचने शहरातील लेडिज टेलराृला 15 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. याबाबतची माहिती अशी, की शहरातील स्वाती कस्तुरे यांनी 13 जानेवारी 2023 मध्ये कोकाटे गल्लीतील सौ. नेहा संत यांच्या दुकानात दोन ब्लाऊज शिवण्यास दिले होते. या ब्लाऊजवर वर्कची डिझाईनही करायची होती. त्यामुळे दोन्ही ब्लाऊजची शिलाई रक्कम 6300 रुपये ठरली होती. पैकी कस्तुरे यांनी तीन हजार रुपये आगावू रक्कम जमा केली होती. 25 जानेवारीला दोन्ही ब्लाऊज शिऊन देण्याचे ठरले होते.
प्रत्यक्षात 25 जानेवारीला एकच ब्लाऊज दिला तर दुसरा ब्लाऊज शिऊन देण्यास टाळाटाळ केली. याबाबत व्हाटस्अप तसेच मोबाईल मेसेज, कॉलद्वारे विचारणा केली होती. समोरुन टाळाटाळ होत असल्याचे लक्षात आल्याने सौ. कस्तुरे यांनी ग्राहक मंचात धाव घेतली. तिथे त्यांनी सर्व पुरावे, वस्तूस्थिती मांडली. त्यानंतर मंचाने सौ. नेहा संत यांनाही नोटिस पाठवली. मात्र त्या बाजू मांडण्यास हजर झाल्या नाहीत. अखेर ग्राहक मंचाने एकतर्फी सुनावणी घेऊन आदेश देत 10 हजार रुपये दंडाची शिक्षा तसेच तक्रारकर्त्यास याचिकेच्या खर्चापोटी 5 हजार रुपये देण्याचे आदेश सौ. संत यांना दिले. दुसरा ब्लाऊज पैसे ने घेता 15 दिवसांत शिऊन देण्याचे आदेशही दिले आहेत. अॅड. पी. पी. कस्तुरे यांनी तक्रारकर्त्याची बाजू मांडली. हा निकाल मंचचे अध्यक्ष किशोर वडणे, सदस्य वैशाली बोराडे यांनी दिला.