धाराशिव

Dharashiv News | हिरव्‍यागार शिवारात उरला पाला पाचोळा, बळीराजा हवालदिल!

पाऊस गायब; सोयाबीन करपले, शेतकऱ्यांची स्वप्नेही भस्मसात!

पुढारी वृत्तसेवा

उमरगा : आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजाच्या पदरी यंदाही निसर्गाने निराशाच टाकली आहे. दीड महिन्यांपासून पावसाने पाठ फिरवल्याने जोमाने उभे असलेले सोयाबीनचे पीक आता अक्षरशः करपून गेले आहे. हिरवाईने डोलणाऱ्या शेतांचे रूपांतर पिवळसर-तपकिरी पाचोळ्यात झाले असून, डोळ्यांसमोर वर्षभराच्या कष्टांची राख होताना पाहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. एकीकडे पिकाचा घास निसर्गाने हिरावून घेतला असतानाच दुसरीकडे बँकेचे कर्ज, सावकाराचे देणे आणि पुढील हंगामाची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.

यंदा तालुक्यात पावसाचे आगमन तब्बल महिनाभर उशिराने झाले. त्यानंतर जमिनीत पुरेशी ओल झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने पेरणी केली. बियाणे, खते, कीटकनाशकांची फवारणी, मशागत आणि मजुरीसाठी हजारो रुपये खर्च करून पीक उभे केले. आभाळ भरून येईल, वेळेवर पाऊस पडेल आणि यंदा चांगले उत्पादन मिळेल, अशी अपेक्षा होती. या उत्पन्नातून कर्जाचा डोंगर काहीसा हलका होईल, मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागेल आणि घरातील गरजा पूर्ण होतील, अशी स्वप्ने शेतकऱ्यांनी पाहिली होती.

मात्र गेल्या दीड महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने ही सारी स्वप्ने शेतातच कोमेजून गेली आहेत. सोयाबीनच्या शेंगा भरण्याच्या अत्यंत निर्णायक टप्प्यात पाण्याअभावी पिकाची वाढ खुंटली. दिवसभराच्या कडक उन्हामुळे पाने गळून पडली आणि काही दिवसांतच हिरवेगार पीक करपून गेले. अनेक शेतांमध्ये आता सोयाबीनच्या नावाखाली केवळ पाचोळाच उरला आहे. कष्टाने उभे केलेले पीक डोळ्यांसमोर हातातून निसटताना पाहण्याची वेळ बळीराजावर आली आहे.

पिकासोबत चारा-पाण्याचेही संकट

पावसाने पाठ फिरवल्याने केवळ खरीप पिकांचेच नुकसान झाले नाही, तर जनावरांच्या चारा-पाण्याचाही प्रश्न गंभीर बनत आहे. पिकांचे अवशेषही अपेक्षेप्रमाणे उपलब्ध होणार नसल्याने पशुधन जगविण्याचे आव्हान शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहे. दिवसेंदिवस दुष्काळाची छाया अधिक गडद होत असून, प्रशासनाने परिस्थितीची तातडीने दखल घेण्याची मागणी होत आहे.

शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत, पीकविमा भरपाई मिळवून द्यावी, आर्थिक मदत जाहीर करावी, दुष्काळी उपाययोजना लागू कराव्यात तसेच गरजेनुसार चारा छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणी परिसरातील शेतकरी वर्गातून होत आहे.

‘पिकाकडे पाहण्याचीही हिंमत होत नाही’

कर्ज काढून बियाणे, खते, औषध फवारणी, मशागत आणि मजुरीवर हजारो रुपये खर्च करून पीक उभे केले. ही शेती आता हातातून निसटल्यात जमा आहे. पीक वाळत असताना मनात मात्र बँकेचे कर्ज, सावकाराचे देणे, घरखर्च आणि पुढील हंगामाची चिंता सतावत आहे. पाऊस पडेल या आशेवर पीक उभे केले; आता पिकाकडे पाहण्याचीही हिंमत होत नाही, अशी व्यथा मुळज येथील शेतकरी व्यंकट बिराजदार यांनी व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT