मराठवाडा

मराठवाड्याची शान पश्मी कारवान, देश-विदेशातून श्वानाला मागणी

मोहन कारंडे

लातूर; शहाजी पवार : उपजत लावण्य, राखणदारीसाठीची सरसता अन् अल्पखर्ची अशी अनुकूलता लाभलेल्या व मराठवाड्याची शान म्हणून सर्वदूर ओेळखल्या जाणार्‍या लातूर जिल्ह्यातील जानवळ येथील पश्मी कारवान या श्वानजातीला देशभरातून मागणी आहे. विदेशातही काही श्वानप्रेमींनी या श्वानांची पिले नेली आहेत. यातून येथील शेतकर्‍यांना उत्पन्नाचे साधन मिळाले आहे.

या श्वानजातींची लिखित माहिती उपलब्ध नाही. तथापि पिढ्यान्पिढ्या येथील गावकर्‍यांकडून हस्तांतरित होणार्‍या मौखिक माहितीनुसार पूर्वी जानवळ या गावी पठाणांची मोठी वस्ती होती. त्यांना भेटण्यासाठी अफगाणिस्तानातून त्यांचे नातेवाईक जानवळला येत असत. त्यावेळी त्यांच्यासमवेत अंगावर लांब केस असलेले धिप्पाड श्वान असत. जाताना त्यांची आठवण म्हणून ते हे श्वान गावच्या कारभार्‍यास तसेच तेथील प्रतिष्ठित व्यक्तीला भेट म्हणून देत असत. कालांतराने या अफगाणी श्वानांचा स्थानिक श्वानांशी संकर करण्यात आला व त्यातून पश्मी ही जात जन्माला आली असे कळते.

केसाळ श्वान

पश्मी हा पर्शियन शब्द असून त्याचा अर्थ केसाळ असा होतो. याच शब्दावरून जानवळच्या श्वानांना पश्मी हे नाव मिळाले असावे, असे अनेकजण सांगतात. विशेष म्हणजे अफगाण श्वान (अफगाण हाँड) व पश्मी श्वानाच्या केस व शरीरयष्टीत बरेच साम्य आढळते. त्यावरून या तर्काला पुष्टी मिळते. हे श्वान राखणदारी व इमानदारीसाठी प्रसिद्ध आहे. याच्या अनेक कथा या परिसरात त्यांचे श्वानमालक मोठ्या कौतुक व अभिमानाने सांगतात. सर्व ऋतू व वातावरणाशी ही जात समरस होते.

देशभर मागणी

विदेशी श्वानाच्या तुलनेत अल्पखर्ची असल्याने त्याला देशभर मागणी असते. साधारणपणे डिसेंबर ते जानेवारी या कालावधीत येथे पिलांची उपलब्धता असते. तरीही अनेक श्वानप्रेमी त्यापूर्वीच येऊन त्याची मागणी नोंदवतात. साधारणपणे 10 हजारपर्यंत एका नर पिलाची तर मादीची किंमत सात ते आठ हजारांपर्यंत असते. दूध, भाकरी हे त्यांचे खाद्य असते. बरेच जण उकडलेली अंडी व मांसही देतात. अलीकडे त्यांना बाजारात मिळाणारे खाद्यही काहीजण देत आहेत.

'जानवळ कारवान' ही या गावची दुसरी श्वानजात असून ती शिकारीसाठी प्रसिद्ध आहे. शिकार्‍यांच्या कारव्यापुढे (ताफा) चालणारी जात म्हणून या जातीला कारवान हे नाव पडल्याचे येथील गावकरी सांगतात.

वाघांशी सामना

पूर्वी या गावातील टेकड्यांनी वाघांचा वावर होता. सायंकाळच्या सुमारास चराई करताना बैलांवर वाघ हल्ला करत. तो परतवण्यासाठी श्वानही त्यांच्यावर झडप मारत. त्यात श्वानाची मान वाघ जबड्यात धरून त्याला ठार मारत असे. वाघांपासून श्वानांची सुटका व जनावराचे संरक्षण करण्यसाठी गावातील लोहारांनी श्वानांच्या गळ्यात लोखंडाचे धारदार खिळे असलेले पट्टे घातले. यात वाघाने मान जबड्यात धरली की धारदार खिळ्ययाने तो जायबंदी होत असे. नेमके त्यावेळी दुसरा श्वान त्याच्यावर हल्ला करीत असे व वाघच पळ काढत असे. लोखंडाचे असे पट्टे आजही येथील काही गावकर्‍यांकडे पाहावयास मिळतात.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT