छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : क्रांती चौकाजवळील सिल्लेखाना परिसरात एक महिला रडत असल्याचे गस्त घालणाऱ्या दामिनी पथकाला आढळून आले. त्यांनी तिची विचारपूस सुरु केली असता ती मूकबधिर असल्याचे समजले. ही महिला हातवारे करून तिचे गाऱ्हाने मांडत होती, पण पोलिसांना काहीही उमजत नव्हते. अखेर, मूकबधिर संस्थेतील एका शिक्षकाची मदत घेऊन पोलिसांनी तिची तक्रार समजून घेतली आणि संशयिताला शोधून महिलेचे मंगळसूत्र तिला परत मिळवून दिले. गुरुवारी (दि. 13) पोलिसांनी या महिलेची केलेली मदत याची चर्चा सर्वत्र होत आहे..
अधिक माहिती अशी की, शहरात तीन दामिनी पथके आहेत. महिला, मुलींना मदत करण्याचे प्रमुख काम हे पथक करतात. १३ जुलैला दुपारी १ वाजता दामिनी पथकातील अंमलदार लता जाधव आणि सुजाता खरात या क्रांती चाैक ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होत्या. त्यांचे वाहन सिल्लेखाना चौकातून जात असताना तेथे एक महिला रडत असलेली असल्याचे त्यांच्या नजरेस पडले. त्यांनी गाडी थांबवून तिची विचारपूस सुरु केली. सुरुवातीला काहीही न बोलणारी ही महिला नंतर हातवारे करून आपले गाऱ्हाने त्यांच्यासमोर मांडायला लागली. दरम्यान ही महिला मूकबधिर असल्याचे खरात आणि जाधव यांच्या लक्षात आले.
दामिनी पथकाच्या दोन्ही महिला पोलिसांनी एका मूकबधिर संस्थेचा शोध घेऊन प्रोग्रेसिव्ह लाईफ सेंटरचे शिक्षक शलमोन डोंगरे यांना या प्रकरणात मदतीसाठी बोलावले. त्यांना महिलेशी संवाद साधण्यास सांगितले. तेव्हा महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र एकाने घेतले असून तिला पैसे देतो असे सांगून तिची फसवणूक केल्याची माहिती समोर आली. डोंगरे यांनी अधिक संवाद साधून तिच्याकडून संशयिताचे वर्णन व पत्ता विचारून घेतला. त्यानंतर ही माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी संबंधिताला शोधून या प्रकरणात कारवाईचा खाक्या दाखविल्यानंतर त्याने मंगळसूत्र परत केले. दामिनी पथकाच्या अंमलदार लता जाधव आणि सुजाता खरात यांनी हे मंगळसूत्र संबंधित महिलेला परत केले. भरोसा सेलच्या प्रमुख पोलीस निरीक्षक आम्रपाली तायडे, दामिनीच्या सहायक निरीक्षक सुषमा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी केली.