मराठवाडा

युसुफवडगांव येथे श्रीराम नवमी जन्मोत्सव सोहळास भाविकांची अलोट गर्दी

Shambhuraj Pachindre

युसूफवडगांव/प्रतिनिधी : केज तालुक्यातील युसुफवडगांव येथे श्रीराम नवमी जन्मोत्सवस सोहळ्यास मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. "शरथनंदन श्रीरामचंद्र महाराज की जय" असा जयघोष करीत भाविकांनी भरलेल्या १२ गाड्या ओढण्याची परंपरा कायम ठेवली. आज पहिल्या दिवशी रामजन्म सोहळ्यानंतर आलेल्या भाविक भक्तांना श्रीराम ग्रुप पुणे व श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

युसूफवडगांव येथे अतिशय प्राचीन राम मंदीरात प्रभू रामचंद्रासोबत सीता माता, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, आणि हनुमान या देवतांच्या पंचधातूच्या मूर्ती आहेत. मंदिरात चैत्रशुद्ध प्रतिपदेला घटस्थापना केल्यानंतर दशमीपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. गुरूवारी रामनवमी निमित्त पहाटे सर्व मूर्तींना अभिषेक घालून दुपारी प्रभूश्रीरामांची मूर्ती एका सजवलेल्या पाळण्यात ठेवण्यात आली. राममंदिरात श्रीधर महाराज रामदासी यांचे नार्दिय गुलालाचे किर्तन झाले. दुपारी बारा वाजताच्या सुमारास दशरथनंदन रामचंद्र महाराज की जय असा जयघोष करीत गुलाल पुष्प उधळून जन्मोत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर गावातून रामचंद्रांची पालखी मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक वेशीमध्ये आल्यावर १२ बैलगाड्या एकमेकांना बांधून भाविकांनी भरलेल्या या गाड्या ओढण्याचा कार्यक्रम झाला. ढोलताशा पथकाने भाविकांचे लक्ष वेधले. गाड्या ओढण्याचा नेत्रदीपक सोहळा पाहण्यासाठी गाव व परिसरातील हजारो नागरिकांनी गर्दी केली होती.

श्रीराम ग्रुप व स्वामी समर्थ प्रतिष्ठानच्या वतीने भाविकांना महाप्रसादाचे वाटप

युसुफवडगांव येथील श्रीराम मंदिर हे ३५० ते ३७५ वर्ष पुरातन असून दरवर्षी येथे श्रीराम नवमीला जन्मोत्सव सोहळा व याञा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. हा सोहळा पाहण्यासाठी व श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी आजूबाजूच्या पंचक्रोशीतून व मोठ्या संख्येने बाहेरगावाहून भक्त येतात. हा श्रीराम नवमी जन्मोत्सव व याञा महोत्सव 3 दिवस चालतो त्यामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्या अनुशंगाने गतवर्षीपासून श्रीराम नवमीला श्रीराम ग्रुप पुणे व श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानच्या वतीने दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येते.

याही वर्षी दि.29 मार्च रोजी रामजन्म सोहळ्या संपन्न झाल्यानंतर आलेल्या भाविक भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महेश गायके, बापुसाहेब भुसारी, बाळासाहेब लामतुरे, विकास जाधव, अनिल निकम, अनंत जाधव, बाळासाहेब सपकाळ, प्रसाद कुलकर्णी, अमोल थळकरी, महादेव मोडवे, छञुगन निकम, उमाकांत सौंदणे, गणेश रोडगे, दयानंद सातपुते व सचिन उजगरे यांनी परिश्रम घेतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT