Zilla Parishad teacher transfers in the midst of controversy
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जिल्हापरिषद शिक्षकांच्या बदल्या यंदाही वादात सापडल्या आहेत. सार्वत्रिक बदली प्रक्रियेत असंख्य शिक्षकांनी चुकीची माहिती नोंदवून सोयीच्या बदल्या करून घेतल्या. त्यामुळे शिक्षण विभागाने अशा शिक्षकांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी बदली झालेल्या सर्व साडेतीन हजार शिक्षकांना अजूनही कार्यमुक्त करण्यात आलेले नाही. दुसरीकडे बदल्यांमध्ये अनियमितता करणाऱ्या शिक्षकांच्या बदल्या रद्द करण्याच्या मागणीसाठी शिक्षक समितीने विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषण सुरू केले असून, त्यास सहापेक्षा जास्त संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेअंतर्गत साडे आठ हजारांहून अधिक शिक्षक कार्यरत आहेत. यंदा या शिक्षकांच्या सार्वत्रिक बदल्यांची प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात आली. त्यात संवर्ग १, संवर्ग २, संवर्ग ३ आणि संवर्ग ४ मधील शिक्षकांकडून ऑनलाईन पद्धतीने वैयक्तिक माहिती नोंदवून घेण्यात आली होती. काही शिक्षकांनी चुकीची माहिती नोंदवून सोयीच्या ठिकाणी बदल्या मिळविल्या. शिक्षण विभागाने सुमारे साडेतीन हजार शिक्षकांच्या बदल्या केल्या. यात काहींनी स्वतः आजारी असल्याचे, आई वडिल, पत्नी, अपत्य दुर्धर आजारी असल्याचे तसेच अपंगत्वाचे खोटे प्रमाणपत्र सादर केले आहे. चुकीचे प्रोफाईल भरून सेवा ज्येष्ठता नंबर घेऊन मोक्याच्या जागा पदरात पाडून घेतल्या. या प्रकरणी तक्रारी प्राप्त झाल्यानंतर शिक्षण विभागाने गट शिक्षणाधिकाऱ्यांकडून पडताळणी करून घेतली.
गट शिक्षण अधिकाऱ्यांनी त्यांचे अहवाल सादर केले आहे. त्यानुसार संबंधित शिक्षकांवर कारवाईचा प्रस्ताव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांच्याकडे सादर करण्यात आला आहे. यामुळे बदल्या होऊन दीड महिना उलटूनही कोणत्याही शिक्षकाला कार्यमुक्त करण्यात आलेले नाही. आता या प्रकरणात चौकशी समिती नियुक्त करून सर्व दाखल्यांची जिल्हा शल्यचिकित्सकांकडून पडताळणी करण्यात यावी, दोषी शिक्षकांवर कारवाई करावी या मागणीसाठी शिक्षक समितीचे जिल्हा सरचिटणिस रंजित राठोड यांनी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर सोमवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या या उपोषणाला आदर्श शिक्षक समिती, शिक्षक परिषद, अखिल भारतीय महासंघ, शिक्षक संघ शिवाजी पाटील गट, शिक्षक भारती, शिक्षक सेना, विस्थापित वस्ती शाळा शिक्षक समन्वय समिती, आदी संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे.
ज्यांनी चुकीची माहिती भरून बदली करून घेतली, त्या शिक्षकांची मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात सुनावणी घेण्यात येणार असल्याचे तसेच त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे शिक्षणाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. या कारवाईची संचिका जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांच्याकडे सादर झाल्याचेही सांगण्यात आले.