न्यायालयासमोर भरदिवसा तरुणावर चाकूहल्ला File Photo
छत्रपती संभाजीनगर

न्यायालयासमोर भरदिवसा तरुणावर चाकूहल्ला

शहरातील वैजापूर-गंगापूर रोडवरील न्यायालयासमोर सोमवारी (दि.२३) भरदिवसा एका तरुणावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली.

पुढारी वृत्तसेवा

Youth stabbed in broad daylight in front of court

गंगापूर, पुढारी वृत्तसेवा : शहरातील वैजापूर-गंगापूर रोडवरील न्यायालयासमोर सोमवारी (दि.२३) भरदिवसा एका तरुणावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे न्यायालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, शहरात भीतीचे सावट पसरले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अक्षय अनिल बारवाल (२१, रा. नूतन कॉलनी, गंगापूर) हा तरुण न्यायालयासमोर उभा असताना दीपक राजू साळवे (रा. म्हाडा कॉलनी), अभिषेक मावस व आशिष मावस हे तेथे आले. जुन्या भांडणाच्या कारणावरून दोघांत वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि दीपक साळवे याने अक्षयवर धारदार शस्त्राने सपासप वार केल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. हल्ल्यावेळी अभिषेक व आशिष हे त्याच्यासोबत असल्याची माहिती समोर आली आहे.

अचानक झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. गंभीर जखमी अवस्थेत रक्तबंबाळ झालेल्या अक्षयला त्याचा भाऊ सुनील अनिल बारवाल व नागरिकांच्या मदतीने तातडीने गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉ. हर्षल धाबे यांनी प्राथमिक उपचार करूनप्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले आहे. त्याच्यावर तेथे उपचार सुरू असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. हल्ल्याचे नेमके कारण जुन्या वादातून असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर येत असल्याचे पोलिस निरीक्षक कुमार सिंग राठोड यांनी सांगितले. पुढील तपास पोलिस निरीक्षक कुमारसिंग राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक विठ्ठल झांजुर्णे करत आहेत.

कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर

न्यायालयाच्या समोर संवेदनशील व वर्दळीच्या ठिकाणी भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशा घटनांवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT