Sambhajinagar Gangapur Youth Death
गंगापूर : शहरातील माऊली नगर परिसरात ३२ वर्षीय युवकाने राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपविल्याची घटना मंगळवारी (दि. २८) रात्री उघडकीस आली. नारायण हरिकिसन लाहाणे (रा. वाकोद, ता. फुलंब्री, हल्ली माऊली नगर, गंगापूर) असे मृत युवकाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
नारायण लाहाणे हे माऊली नगरातील विजय साबणे यांच्या घरात भाड्याने राहत होते. ते जामगाव रोडवरील पंचगंगा सीड्स कंपनीत कामाला होते, तर त्यांची पत्नी एका खासगी रुग्णालयात परिचारिका म्हणून कार्यरत आहे. हे दाम्पत्य आपल्या चार वर्षांच्या मुलीसह राहत होते.
मंगळवारी दुपारी २ ते रात्री ९ या वेळेत नारायण यांनी घराचा दरवाजा आतून बंद करून घेतला होता. रात्री साडेनऊच्या सुमारास पत्नी कामावरून घरी परतली. तिने दरवाजा ठोठावला आणि वारंवार फोन करून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. काही वेळाने फोनही बंद झाल्याने तिने मध्यरात्री गंगापूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन पोलिसांना माहिती दिली.
यानंतर पोलिसांनी पोलीस हेडकॉन्स्टेबल विष्णू बाप्ते, अनिरुद्ध शिंदे, सर्पमित्र गणेश साळुंके, संदीप महेरे आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी नारायण हे छताच्या पंख्याला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. त्यांना तातडीने खाली उतरवून गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.
या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल गणेश जाधव पुढील तपास करीत आहेत.