छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशनवर नव्याने फलक लावण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी दोन तरूणांनी स्टेशनवरील बोर्डाखाली लंघूशंका केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या तरुणांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या दोघांनी माफी मागितली होती. यातील एका तरूणाने सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बदनामीला आणि धमक्यांना कंटाळून विहिरीत उडी घेऊन जीवन संपविल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महेश आढे असं या मृत तरूणाचे नाव असून तो जालन्यातील परतूर तालुक्यातील ठोकमळ तांडा येथील रहिवासी होता.
काही दिवसांपूर्वी महेश आढे आणि त्याचा एक मित्र छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशनवर असलेल्या एका पिवळ्या फलकाजवळ लघुशंका करत असताना एका व्यक्तीने त्यांचा व्हिडिओ काढला होता. हे दोन्ही तरुण त्यावेळी नशेत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जास्त प्रमाणात व्हायरल झाला. दुसऱ्या दिवशी या दोघांनी केलेल्या कृत्याबद्दल माफी मागितली होती. पण तरीही या दोघांना दररोज धमकीचे फोन व मँसेज येत होते. व्हिडिओ व्हायरल झाल्याने झालेल्या बदनामीमुळे आणि धमक्याच्या मॅसेजमुळे महेश नैराश्येत गेला होता. त्याने घराच्यांना व मित्रांना 'मला हे सहन होत नाही, मी जीव देईन' असे म्हटले होते. त्यानंतर कुटुंबियांनी व त्याच्या मित्रांनी त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र बुधवारी (दि.५) सतत होणाऱ्या मानसिक छळाला कंटाळून त्याने विहिरीत उडी घेऊन जीवनयात्रा संपविली. तरूणाच्या मृत्यूमुळे परिसरात संताप व्यक्त होत आहे. ज्यांनी कोणी त्याचे व्हिडिओ व्हायरल केलेत, आणि धमक्या दिल्या आहेत, त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी नातेवाईकांसह गावकऱ्यांनी केली आहे.