गौरव नेरकर याचा धारेश्वर धबधब्यात तोल जाऊन पडून मृत्यू झाला.  Pudhari News Network
छत्रपती संभाजीनगर

छ. संभाजीनगर : धारेश्वर धबधब्यात तोल जाऊन पडून तरुणाचा मृत्यू

पुढारी वृत्तसेवा

वरठाण; पुढारी वृत्तसेवा : निसर्ग सौदर्य लाभलेल्या धारेश्वर (धारकुंड) धबधब्यात पाय घसरून पडल्यामुळे एकाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि.२१) सायंकाळी घडली होती. त्यानंतर १७ तासांनी आज (दि.२२) सकाळी अकरा वाजता त्याचा मृतदेह धारेश्वर धबधब्याच्या कुंडाच्या कपारीत सापडला. गौरव किसन नेरकर (वय २०, रा. खंडेरावनगर, जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे.

गौरवचा अचानक तोल जाऊन पाय घसरला

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील  गौरवसह १६ जणांचा एक समूह रविवारी सायंकाळी सहा वाजता सोयगाव तालुक्यातील धारेश्वर धबधब्याजवळ मुक्कामासाठी आले होते.  रात्रभर मुक्काम करून पहाटे सकाळीच दर्शन घेवून सोमवारी त्यांचा परतीचा प्रवास होणार होता. दरम्यान,  रविवारी सायंकाळी सहा वाजता धबधब्याजवळ भ्रमंती करत असताना गौरवचा अचानक तोल जाऊन पाय घसरला. व तो धबधब्यात जाऊन पडला. एक तास होऊनही तो परतला नसल्याने मित्रांनी त्याचा शोध घेतला. परंतु, तो आढळला नाही. त्यामुळे त्यांनी रात्री आठ वाजता बनोटी पोलीस दुरक्षेत्र गाठून गौरव हरविल्याची तक्रार दिली.

सोयगाव पोलिसांची रात्री १ पर्यंत रेस्क्यू मोहीम

सोयगाव पोलिसांनी रात्री एक वाजेपर्यंत ग्रामस्थ व पोलीस पाटील सुनील जाधव यांच्या मदतीने रेस्क्यू मोहीम राबविली. रात्री एकनंतर रेस्कू मोहीम थांबवून पुन्हा सोमवारी सकाळी सात वाजता सोयगावचे उपनिरीक्षक रजाक शेख, विकास दुबिले, संदीप सुसर, सतीश बर्डे, राजू बर्डे यांनी पट्टीचे पोहणारे रामदास जाधव, श्रीरंग जंजाळ, बंडू पाटील, सोन्या गवळी आदींच्या मदतीने रेस्क्यू मोहीम हाती घेतली. अखेर रामदास जाधव यांना धबधब्याच्या खोल कपारीत मृत गौरव नेरकर चा मृतदेह आढळून आला. बनोटी प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. या प्रकरणी पोलीस निरीक्षक पंकज बारवाल उपनिरीक्षक रज्जक शेख विकास दुबिले संदीप सुसर राजू बर्डे आदी पुढील तपास करत आहे .

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT