राहुल जांगडे, छत्रपती संभाजीनगर:
आजच्या बदलत्या आणि धावपळीच्या स्पर्धात्मक युगात, कामांच्या व्यापामुळे ताणतणाव (स्ट्रेस) हा प्रत्येकाच्या आयुष्याचा भाग बनला आहे. हा ताण केवळ मानसिकच नव्हे तर शारीरिक आरोग्यालाही धोका निर्माण करत असल्याने टेन्शन घ्यायचे नाही. मित्र, नातेवाईकांसमोर व्यक्त व्हा. मनसोक्त जगा आणि काळजी वाटलीच तर? तज्ज्ञांचा सल्ला घ्या, असे आवाहन मानसोपचारतज्ज्ञांनी यातही जागतिक ताणतणाव जागरुकता दिन दरवर्षी नोव्हेंबर महिन्यातील पहिल्या बुधवारी साजरा केला जातो.
लोकांमध्ये जनजागृती करणे आणि तणाव व्यवस्थापनाचे योग्य मार्ग शिकवणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. धावपळीची जीवनशैली, स्पर्धा, आर्थिक विवंचना आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांचा वाढता भार यामुळे सध्या लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वच जण मानसिक ताणतणावाच्या गर्तेत अडकत चालले आहेत. व्यायाम, मैदानी खेळाचा अभाव, वाढते स्क्रिन टाईम यामुळेही मानसिक ताण येऊन शारीरिक व मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याने रुग्णालयांमध्ये गर्दी वाढत आहे.
आजच्या काळात वाढता 'स्क्रीन टाइम', आणि अपुरी झोप यामुळे ताणतणावाचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. प्रत्येक गोष्टीची तुलना दुसन्यांशी करणे बंद केले पाहिजे. नियमित व्यायाम, सकस आहार आवश्यक आहे. छंद जोपासणे आणि रात्री वेळेवर झोप घेणे यामुळे मेंदूतील ताण कमी करणारे हार्मोन्स तयार होतात. अपेक्षांचे ओझे कमी करून वर्तमानात जगायला शिकलो, तर ताणतणाव कमी होतो. गरज वाटल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
-डॉ. मेराज कादरी, मानसोपचार तज्ज्ञ
बदलत्या काळात मानसिक ताणतणाव ही अत्यंत सामान्य गोष्ट झाली असली, तरी त्याकडे दुर्लक्ष करणे अंगलट येऊ शकते. चिडचिड होणे, निद्रानाश, सतत विचारचक्र सुरू राहणे, भूक न लागणे किंवा एकाग्रता कमी होणे ही ताणतणावाची प्राथमिक लक्षणे आहेत. अनेकदा लोक तणावाबद्दल किंवा मानसिक आरोग्याबद्दल उघडपणे बोलणे टाळतात. मात्र, तणावातून बाहेर पडण्याचा पहिला आणि सर्वांत सोपा मार्ग म्हणजे मन मोकळे करणे. आपल्या जवळच्या व्यक्तींशी, मित्रांशी किंवा गरज पडल्यास तज्ज्ञांशी संवाद साधावा. मानसिक आजार किंवा ताण हा कोणताही कलंक नसून त्यावर वेळीच योग्य उपचार व समुपदेशन शक्य आहे.
- डॉ. अमोल पाथ्रीकर, मानसोपचारतज्ज्ञ