Balasaheb Thackeray : १५ कोटींच्या निधीने बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या कामाला गती Pudhari News Network
छत्रपती संभाजीनगर

Balasaheb Thackeray : १५ कोटींच्या निधीने बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या कामाला गती

डिसेंबरपर्यंत कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट : जयंतीदिनी, २३ जानेवारीला लोकार्पणासाठी प्रशासनाचा प्रयत्न

पुढारी वृत्तसेवा

Work on Balasaheb Thackeray Memorial gains momentum with ₹15 crore fund

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा सिडको येथे उभारण्यात येत असलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक व स्मृतीवनाच्या रखडलेल्या कामांना अखेर आर्थिक बळ मिळाले आहे. राज्य शासनाने नुकताच १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याने अंतिम टप्प्यातील कामांना वेग देण्यात येणार आहे. त्यामुळे डिसेंबरअखेर सर्व नागरी व विकासकामे पूर्ण करून बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी येत्या २३ जानेवारीला स्मारकाचे लोकार्पण करण्यासाठी प्रशासनाने नियोजन सुरू केले असल्याची माहिती महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी दिली.

सिडको एन-५ परिसरातील सुमारे १७ एकर जागेत हे भव्य स्मारक आणि स्मृतीवन विकसित करण्यात येत आहे. स्मारकाचे बहुतांश बांधकाम पूर्ण झाले असून, शासनाकडून मंजूर झालेल्या नव्या निधीतून उर्वरित नागरी कामे, परिसराचे सुशोभीकरण, पायाभूत सुविधा आणि पर्यटकांसाठी आवश्यक सोयी-सुविधा उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या कामांना गती मिळणार आहे.

स्मारकाचे प्रमुख आकर्षण ठरणारा शिवसेनाप्रमुखांचा ५१ फूट उंच कांस्य धातूचा पुतळा तयार झाला असून, तो उभारण्यासाठी भव्य चबुतऱ्याचे काम हाती घेतले जाणार आहे. तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या राजकीय, सामाजिक आणि वैचारिक प्रवासाची माहिती देणारी अत्याधुनिक फोटो गॅलरी, त्यांच्या वापरातील वस्तू, भाषणांच्या ध्वनिचित्रफिती आणि स्मृतिचिन्हांचे स्वतंत्र दालनही तयार करण्यात आले आहे. या दालनात कोणत्या वस्तू प्रदर्शित करायच्या, याबाबतचा अंतिम निर्णय संबंधित समिती घेणार असल्याचे आयुक्त येडगे यांनी स्पष्ट केले.

५१ फूट कांस्य पुतळा ठरणार मुख्य आकर्षण

या स्मारकात उभारण्यात येणारा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा ५१ फूट उंच कांस्य धातूचा पुतळा हे प्रमुख आकर्षण असणार आहे. या पुतळ्यासाठी भव्य चबुतरा उभारण्यात येणार असून, परिसरात फोटो गॅलरी, स्मृतिदालन, भाषणांच्या ध्वनिचित्रफिती आणि त्यांच्या वापरातील वस्तूंचे प्रदर्शनही करण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT