गुंतवणुकीचे आमिष ; डॉक्टराला घातला साडे चार कोटींचा गंडा pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar Crime : गुंतवणुकीचे आमिष ; डॉक्टराला घातला साडे चार कोटींचा गंडा

भामट्यांकडून व्हॉट्सअॅप ग्रुप, बनावट वेबसाईटचा वापर

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीवर अल्प कालावधीत दुप्पट तिप्पट नफ्याचे आमिष दाखवून उद्योजक महिलेला सायबर भामट्यांनी तब्बल ४ कोटी ५२ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना १६ मे ते १ जूनदरम्यान, सूतगिरणी चौक, गारखेडा, परिसरात घडली.

याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात झेड ९९ : एचएसबीसी ग्रुप स्टोक रिसर्च इन्स्टिट्यूट या व्हॉट्सअॅप ग्रुपच्या अॅडमीनसह इतर भामट्यांविरुद्ध सोमवारी (दि.१) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गारखेडा येथील सूतगिरणी चौक परिसरात राहणाऱ्या ४५ वर्षीय महिला डॉक्टर (डेंटिस्ट) या सुमारे तीन आठवड्यांपूर्वी व्हॉट्सअॅपवरील झेड ९९ एचएसबीसी ग्रुप स्टोक रिसर्च इन्स्टिट्यूट ग्रुपमध्ये सहभागी झाल्या होत्या.

या ग्रुपचा अॅडमीन आणि इतर सदस्यांनी त्यांना शेअर बाजारामध्ये गुंतवणूक केल्यास अल्पावधीत दुप्पट, तिप्पट नफा मिळवून देण्याचे आकर्षक आमिष दाखवले. त्यांच्या भूलथापांना बळी पडून डॉक्टरने भामट्याने दिलेल्या लिंकद्वारे ऑनलाईन इन्व्हेस्टमेंट पोर्टलवर स्वतःचे खाते तयार केले. ग्रुप अॅडमीनच्या सूचनेनुसार डॉक्टर महिलेने वेळोवेळी त्यांच्या सारस्वत बँकेच्या खात्यातून आरटीजीएसद्वारे तब्बल ४ कोटी ५२ लाख रुपये भामट्यांना पाठवले.

परदेशी सर्व्हर अन् केवळ आकड्यांचा खेळ

देशभरात सायबर भामटे सुशिक्षित नागरिकांना जाळ्यात ओढून कोट्यवधी रुपयांची रोकड लंपास करत आहेत. या गुन्ह्यांचे धागेदोरे कंबोडियासह अन्य देशांपर्यंत पोहोचले आहेत. विदेशातील सर्व्हरचा वापर करून हे भामटे हुबेहूब दिसणाऱ्या बनावट वेबसाईट तयार करतात. या वेबसाईटवर गुंतवणूकदाराची खोटी प्रोफाइल बनवून त्यावर केवळ आकड्यांचा आभासी खेळ खेळला जातो. प्रत्यक्षात गुंतवणूकदाराने पाठवलेले पैसे भामटे स्वतःच्या बँक खात्यात वळवून घेऊन मोकळे होतात, अशी माहिती तपासात समोर आली आहे.

पोर्टलवर दिसत होता चारपट नफा

डॉक्टर महिलेने सुरुवातीला काही रक्कम गुंतविली. भामट्यांच्या बनावट पोर्टलवर त्यांची गुंतविलेली रक्कम चारपट झाल्याचे आणि मोठा नफा झाल्याचे भासविण्यात आले. काही दिवसांनी पोर्टलवरील नफ्याची रक्कम काढण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपींनी तांत्रिक अडचणी आणि विविध कारणे सांगून रक्कम देण्यास विलंब केला.

वारंवार प्रयत्न करूनही एकही रुपया बँक खात्यात जमा न झाल्याने आणि संशयितांनी समाधानकारक उत्तरे देणे बंद केल्याने फसवले गेल्याची खात्री झाली. रचना यांच्या पतीने १ जून रोजी राष्ट्रीय सायबर गुन्हे हेल्पलाइन क्रमांक १९३० वर तक्रार नोंदवली होती. अधिक तपास पोलिस निरीक्षक अशोक भंडारे करत आहेत.

१ कोटी १५ लाख गोठवले- " डॉक्टर महिलेची फसवणूक झाल्याचे समजताच सायबर पोलिसांनी तातडीने चक्र फिरवली. भामट्यांना पाठवलेल्या ४ कोटी ५२ लाखांपैकी १ कोटी १५ लाख रुपये मंगळवारपर्यंत (दि. २) गोठविण्यात पोलिसांना यश आले आहे. सायबर पोलिसांकडून शाळा, महाविद्यालये आणि सोसायट्यांमध्ये सातत्याने जनजागृती केली जाते. नागरिकांनी कोणत्याही अनधिकृत वेबसाईट, अनोळखी लिंक्स, एपीके फाईल्स आणि स्कॅमपासून सावध राहावे. -
सोमनाथ जाधव, पोलिस निरीक्षक, सायबर ठाणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT