Wipro company in Waluj is on the verge of closure!
वाळूज महानगर, पुढारी वृत्तसेवा वाळूज औद्योगिक क्षेत्रात ३३ वर्षांपापूर्वी सुरू करण्यात आलेली विप्रो इंटरप्राझेस कंपनी बंद करण्याच्या हालचाली सुरू झाल्याने कामगारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आर्थिक नुकसानीचे कारण पुढे करत कंपनी व्यवस्थापनाने १० डिसेंबर २०२६ पासून कंपनी बंद करण्याची नोटीस पंधरा दिवसांपूर्वी बजाविण्यात आली आहे. या निर्णयामुळे ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर कंपनीतील २०८ कायम कामगारांच्या रोजगारावर टांगती तलवार निर्माण झाली आहे.
वाळूज औद्योगिक क्षेत्रातील एल-८ सेक्टर मध्ये १९९३ साली सुरू करण्यात आलेल्या विप्रो कंपनीत विविध प्रकारचे इलेक्ट्रिक बल्ब, भांडी स्वच्छ करण्याचे लिक्वीड तसेच सुगंधित अगरबत्ती तयार करण्यासाठीचे लिक्वीड निर्मिती केली जाते. मात्र, वाढता उत्पादन खर्च, उत्पादनांना मिळणारी घटती मागणी, गेल्या पाच वर्षांपासून सुरू असलेला आर्थिक तोटा आणि स्वेच्छानिवृत्ती योजनेला कामगारांकडून मिळालेला अल्प प्रतिसाद, ही कारणे पुढे करत व्यवस्थापनाने कंपनी बंद करण्याची नोटीस बजावली आहे.
कंपनी व्यवस्थापनाने नवीन वेतन करार करावा, यासाठी आम्ही वेतन वाढीचा प्रस्ताव दिला होता. मात्र, वेतनवाढ करण्याऐवजी कंपनी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जो कायदा अद्याप पारित झाला नाही त्या आधारे नोटीस बजावणे हा निर्णय अन्यायकारक आहे. कामगारांवर अन्याय करणाऱ्या या निर्णयाविरोधात आम्ही औद्योगिक न्यायालयात दाद मागणार असल्याचे विप्रो कामगार संघटनेचे अध्यक्ष संजय कोठुळे यांनी सांगितले.
दोन विभागांचे उत्पादन आधीच बंद
कंपनीच्या नोटिशीनुसार, जीएलएस विभागाचे उत्पादन १७जुलै २०२६ पासून, तर गिफी विभागाचे उत्पादन १९ सप्टेंबरपासून बंद करण्यात आले आहे. या विभागांतील उत्पादन पुन्हा सुरू होण्याची शक्यता नसल्याचे व्यवस्था-पनाने नमूद केले आहे. यानंतर ३ ऑक्टोबरपासून कंपनीतील सर्व २०८ कायम कामगारांना कामावर येण्याची आवश्यकता नसल्याचे कळविण्यात आले आहे. या कामगारांना दोन महिने घरबसल्या वेतन देण्याचा निर्णयही व्यवस्थापनाने घेतला आहे.