Wife taken abroad and tortured for money
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्त-सेवा : केरळमध्ये जमीन घेण्यासाठी माहेराहून पाच लाख घेऊन ये, असे म्हणत सासरच्यांनी विवाहितेचा छळ करून मारहाण केली. ओमान देशात नर्सची नोकरी लावण्याचे आमिष दाखवून पती सोबत घेऊन गेला. तिथेही विवाहितेला दारू पिऊन मारहाण केली. हा प्रकार केरळ, ओमान आणि नंदनवन कॉलनी भागात घडला. पती सॅम जी जेकब, सासू सुमय्या जॉर्ज जेकब, सासरा जॉर्ज (सर्व रा. कोट्टाराकारा केरळ) अशी आरोपींची नावे आहेत.
फिर्यादी ३४ वर्षीय जिनू (रा. नंदनवन कॉलनी) यांच्या तक्रारीनुसार, त्यांचे लग्न सॅम सोबत केरळ येथे २०१७ साली झाले. लग्नात १३ लाख रुपये खर्च केला. ३९२ ग्रॅम सोन्याचे दागिने दिले. सासरी जाताच सासूने चैन स्नॅचिंग फार होतात म्हणत दागिने काढून घेतले. त्यानंतर पती सॅम ओमान देशात नोकरीसाठी निघून गेला. त्यानंतर सासू सासऱ्यांनी जिनू यांचा शारीरिक व मानसिक छळ सुरू केला. त्या गर्भवती राहिल्यानंतर त्यांना सासू सासऱ्यांनी उशिरा हॉस्पिटलमध्ये नेले.
दोन दिवसांत सुटी घेण्यास भाग पाडले. त्यांना २०१८ साली मुलगा झाला. त्यानंतर छळाला कंटाळून त्या २०१९ मध्ये माहेरी संभाजीनगरला आल्या. एका खासगी रुग्णालयात नर्समधून नोकरी करू लागल्या. २०२१ पर्यंत त्यांनी काम केले. त्यादरम्यान पती सॅम इथे येऊन त्यांना शिवीगाळ करून मारहाण करत होता. २०२१ मध्ये सॅमने त्यांना ओमानमध्ये नर्सची नोकरी लावण्याचे आमिष दाखवून मुलासह सोबत घेऊन गेला. तिथेही तो त्यांना दारू पिऊन मारहाण करायचा.
२०२२ मध्ये त्यांना केरळला पाठवले. २०२३ मध्ये माहेराहून जमीन घेण्यासाठी पाच लाख घेऊन ये म्हणून छळ सुरू झाला. त्यांचे सामान घराबाहेर फेकले. जिनू यांनी आई-वडिलांना फोन करून बोलावून घेतले. तेव्हाही पैसे घेऊन या तेव्हाच मुलीला सोबत घेऊन जा, असे म्हणत अपमानित केले. २०२३ मध्येच जिनू या पुन्हा ओमान येथे नोकरीसाठी गेल्या. मात्र पती छळ करत असल्याने त्यांनी जुलै २०२५ मध्ये माहेरी राहण्यासाठी आल्या. त्यानंतर छावणी पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास जमादार लता जाधव करत आहेत.