Widespread cutting of large trees by timber mafia
सोयगाव, पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील सोयगाव एस टी बसस्थानकाला लागून शासकीय गोडाऊनच्या आवारातील डेरेदार वृक्षांची लाकूड माफियांकडून अवैध कत्तल करण्यात आली. ही तोड गुरुवारी (दि.१९) दुपारी सुटीचा गैरफायदा घेत उरकण्यात आली. हा प्रकार सुज्ञ नागरिकांच्या लक्षात येताच विचारपूस करण्यापूर्वीच त्या लाकूड माफियांनी पोबारा केला आहे.
याप्रकरणी सबंधित वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल मिसाळ यांना विचारणा केली असता या वृक्षतोडीसाठी कोणतीही परवानगी देण्यात आलेली नसल्याचे सांगण्यात आले. तसेच महसूल विभागाची देखील वृक्षतोडीलासाठी परवानगी नसल्याचे समोर आले आहे. वुक्ष तोडीची तक्रार करूनही संबंधित वन विभाग व महसूल विभाग कारवाई करत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
सोयगाव तालुक्यातील वृक्ष तोड माफियांनी शासकीय वृक्षावर लक्ष केंद्रित केले आहे. खुलेआम डेरेदार वृक्षांची सर्रास तोड. सुरु केली आहे. या वृक्षतोडी मध्ये माफिया ३५ ते ४० वर्ष वयोमान असलेली डेरेदार वृक्षतोड करीत आहेत. यापूर्वीही नागरिकांनी बहुलखेडा व कंकराळा ते माळेगांव रस्त्यावरील शासकीय हद्दीतील वृक्षतोड सुरू आहे, अशी तक्रार सोयगाव वनविभागाकडे केली होती. वनविभागाकडून लाकूड माफियां विरोधात ठोस कारवाई होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
संबंधित वृक्षतोड विनापरवानगी आहे. आमच्या वन विभागाने त्यास परवानगी दिलेली नाही. याची चौकशी करण्यात येईल.अनिल मिसाळ, वन परिक्षेत्रपाल अधिकारी सोयगाव परिक्षेत्र.
रस्त्यावरील वनसंपदा धोक्यात
गेल्या महिन्याभरात लाकूड माफियांनी दोन हजार शासकीय वृक्षांची तोड केली असल्याचा अंदाज आहे. एकीकडे शासन दर वर्षी वृक्षसंवर्धन व वृक्षारोपणावर कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे. तर दुसरीकडे सोयगाव तालुक्यात लाकूड माफिया सर्रास वृक्षतोड करीत आहेत. या लाकूड माफिया विरोधात काही ठोस कारवाई न झाल्यास सोयगाव तालुक्यात रस्त्यावरील वनसंपदा नष्ट होऊन रस्ता बोडखा होण्याची भीती नागरिकांना आहे.