Which ward belongs to whom? The decision will be made today.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका तब्बल १० वर्षांनंतर होत आहे. यंदाच्या निवडणुका वॉडएिवजी प्रभाग पद्धतीने होत आहे. निवडणूक आयोगाने मंजूर केलेल्या २९ प्रभागांतील ११५ बॉडीसाठी आज (दि.११) सकाळी ११ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यगृहामध्ये आरक्षण सोडत होणार असून, या प्रक्रियेसाठी महापालिकेने तब्बल १५० अधिकारी-कर्मचारी तैनात केले आहेत. तर सोडतीच्या चिठ्या काढण्यासाठी ६ विद्यार्थ्यांची निवड केली आहे. सर्वच इच्छुकांनी आर-क्षणापासून वाचण्यासाठी देव पाण्यात ठेवले आहेत.
महापालिकेच्या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने २९ प्रभाग निश्चित केले आहेत. त्यातील २८ प्रभागांत प्रत्येकी ४, तर एका प्रभागात ३ असे ११५ सदस्य राहणार आहेत. २०११ सालच्या जनगणनेतील लोकसंख्येचा आधार घेत आरक्षण काढली जाणार आहे. त्यानुसार अनुसूचित जातीसाठी (एससी) २२ जागा राखीव राहणार आहेत. त्यातील ११ जागा या ५० टक्के महिला आरक्षणानुसार महिलांसाठी राखीव ठेवाव्या लागणार आहेत. अनुसूचित जमातीसाठी दोन जागा असून, त्यापैकी एक महिलासाठी राखीव असेल.
दरम्यान, इतर मागास प्रवर्गासाठी ३३ जागा आरक्षित केल्या जातील, त्यापैकी १७ जागा महिलांसाठी आरक्षित होतील. सर्वसाधारण प्रवर्गासाठी ५८ जागा पैकी २९ जागा महिलांसाठी राहतील. ११५ जागांपैकी ५८ जागा महिलांसाठी राखीव राहणार आहे. या जागा नेमक्या कोणत्या आरक्षित होतील हे आरक्षण सोडतीवेळी करणार आहे, मनपा प्रशासक तथा आयुक्त जी. श्रीकांत यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. आरक्षण सोडतीसाठी अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील यांच्या नेतृत्वाखाली १५० अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
६ विद्यार्थ्यांची निवड
आरक्षण सोडतीसाठी महापालिका शाळेतील ६ विद्याथ्यांची निवड केली आहे. यात ३ मुली आणि ३ मुलांचा समावेश आहे. हे विद्यार्थीच इच्छुकांचे भाग्यविधाते ठरणार आहेत.
सोडत ठरवणार कोणाचा वॉर्ड भाग्यवान, कोणाचा राजकीय अध्याय संपुष्टात !
मनपा निवडणूक आरक्षण सोडतीकडे सर्वांच्या नजरा : सत्तेचे नवे गणित, नव्या समीकरणांची नांदी
मुकेश चौधरी
छत्रपती संभाजीनगर:
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय हलचालींना वेग आला असून, मंगळवारी (दि. ११) होणारी प्रभाग आरक्षण सोडत ही केवळ औपचारिकता नव्हे, तर येत्या पाच वर्षांच्या सत्तेवा नकाशा ठरवणारा निर्णायक टप्पा ठरणार आहे. कोणत्या प्रभागावर अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी वा महिलांचे आरक्षण लागू होणार, याची उत्सुकता सर्व राजकीय पक्षांत चांगलीच वाढली आहे. या सोडतीवरच अनेक विद्यमान नगर सेवकांसह इच्छुकांचे राजकीय भवितव्य अवलंबून असल्याने सर्वाच्याच नजरा या सोडतीकडे लागल्या असून, काही ठिकाणी आतापासूनच सत्तेचे नवे गणित, नव्या समीकरणांची रणनीती ठरवली जात आहे. त्यावरून आजची सोडत कोणाचा वॉर्ड भाम्यवान आणि कोणाचा राजकीय अध्याय संपुष्टात आणणारा ठरवणार हा मुद्दा राजकीय वर्तुळात चर्चीला जात आहे.
राजकीय गणित
शिवसेना (दोन्ही गट), भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार व अजित पवार गट), मनसे, एमआयएम आणि अपक्ष नगरसेवकांनी आपापले राजकीय गणिते मांडायला सुरुवात केली आहे. या सोडतीमुळे शहरातील सत्तासमीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता असून, काही प्रभागांत नवे चेहरे पुढे येतील, तर काही जुन्या घराण्यांचे वर्चस्व डळमळीत होऊ शकते. पक्ष रणनीतिकार, कार्यकर्ते या सोडतीकडे लक्ष ठेवून असणार आहेत.