जरंडी (छत्रपती संभाजीनगर ) : मुलगा, मुलगी हा भेदभाव कायमचा दूर व्हावा. तसेच मुलाप्रमाणेच मुलीच्या जन्माचे स्वागत व्हावे. मुलगाच हवा ही मानसिकता बदलावी. मुलीच्या जन्मानंतर कुटुंबात तिचेही स्वागत व्हावे यासाठी सोयगाव तालुक्यातील जरंडी हे गाव गेल्या चार वर्षांपासून प्रयत्न करीत आहे. एखाद्या कुटुंबात पहिली मुलगी जन्मास आल्यास त्या कुटुंबाला १५०० रुपये ग्रामपंचायतीतर्फे दिले जाते. एवढेच नव्हे तर तिच्या आई-वडिलांचा सत्कार केला जातो. त्यामुळे मुलीच्या जन्माचे स्वागत करणारे गाव, अशी ओळख या गावाची तालुक्यात होऊ लागली आहे.
गावकऱ्यांत एक सामाजिक सलोखा निर्माण करता यावा यासाठी जरंडी ग्रामपंचायत सरपंच स्वाती पाटील, उपसरपंच संजय पाटील, वंदना पाटील, नीलिमा पवार व ग्रामपंचायत अधिकारी सुनील मंगरुळे यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविला जातो. गावातील एखाद्या कुटुंबात प्रथम मुलगी जन्माला आल्यास १५०० रुपये रोख व त्या मातेचा सत्कार केला जातो. गावातील कुणाच्या कुटुंबातील व्यक्ती मृत पावल्यास तात्काळ मदत म्हणून पंधराशे रुपये दिले जातात. गावातील मुलीचे लग्न झाल्यानंतर माहेर भेट म्हणून अकराशे रुपये दिले जातात. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या कार्यक्रमात दोन मातांचा सत्कार करण्यात आला होता. अकरा महिलांना माहेर भेट म्हणून ११०० रुपयांचा धनादेश देऊन सत्कार करण्यात आला. या उपक्रमाच्या माध्यमातून गावातील सामाजिक सलोखा निर्माण व्हावा. तसेच आपल्या गावाप्रती आपुलकीची भावना निर्माण व्हावी, मुलगा आणि मुलगी यांच्यात भेदभाव केला जाऊ नये, महिलांचा सन्मान व्हावा हा या मागील उद्देश असल्याचे सरपंच स्वाती पाटील यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांना देणार प्रोत्साहन
गावातील विद्यार्थ्यांनी नवोदय व स्कॉलरशिप परीक्षेत प्राविण्य प्राप्त केल्यास त्यांना ग्रामपंचायतीमार्फत अकराशे रुपये व शालेय शैक्षणिक शालेय वस्तू भेट स्वरूपात देऊन सत्कार करण्यात येणार असल्याचे ग्रामपंचायत अधिकारी सुनील मंगरुळे यांनी सांगितले.