छत्रपती संभाजीनगर : सध्या अधिक मास म्हणजेच धोंड्याचा महिना सुरू असल्याने शुभविवाहसाठी मुहूर्त नाही. मात्र अधिक मास संपल्यानंतर 19 जूनपासून ते 11 जुलैपर्यंत लग्न कार्यासाठी 14 शुभ मुहूर्त आहेत. त्यानंतर लगेच गुरू आणि शुक्र अस्त असून, चातुर्मासाची सुरुवात होईल. त्यामुळे विवाहासाठी इच्छुक वधू-वरांनी लग्नाची करावी घाई, अन्यथा सहा महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे.
दरवर्षी मे महिन्यात लग्न कार्याचा सिझन आणि धामधूम सुरू असते. मात्र यंदा अधिक मास आला आहे. या काळात विवाह, मुंज, गृहप्रवेश यासारखे मांगलिक कार्ये वर्ज्य मानली जातात. त्यामुळे 17 मे पासून ते 15 जूनपर्यंत शुभविवाहाचे मुहूर्त नाही. अधिक मास समाप्त होताच इच्छुक वधू-वरांना लग्नाचा बार उडवता येणार आहे.
19 जून हा शुभ विवाहाचा पहिला मुहूर्त आहे. या महिन्यात 20, 22, 23, 24 आणि 27 जून असे सहा मुहूर्त आहेत. तर जुलै महिन्यात 1, 2, 3, 4, 7, 8, 9 आणि 11 असे आठ मुहूर्त आहेत. यानंतर गुरू आणि शुक्र अस्त असल्याने विवाह मुहूर्त नाही. थेट पुढच्या वर्षी म्हणजेच 2027 मध्ये जानेवारी महिन्यात तुळशी विवाहानंतर लग्नाची धामधूम सुरू होईल.
अधिक मासानंतर लग्नासाठी 14 मुहूर्त- अधिकमासानंतर विवाह, वास्तू, उपनयन संस्कार या शुभ कार्यासाठी 19 जून ते 11 जुलैपर्यंत फक्त 14 मुहूर्त आहे. त्यानंतर गुरू शुक्र अस्त शिवाय चातुर्मास आणि नाशिक येथील सिंहस्थ असल्याने जानेवारीपर्यंत मुहूर्त नाही.प्रवीण कुलकर्णी, गुरुजी