We are not against any caste: Ambedkar
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : आम्ही कोणत्या जातीविरुद्ध नसून, सरकार विरोधी भूमिकेच्या विरोधात असून, आम्ही सर्व जातींची एकजूट आहे. हे या संघर्ष परिषदेतून दाखवून द्यायचे आहे. अनुसूचित जातीच्या आरक्षणासमोरील उपवर्गीकरणाचा प्रश्न हा अनुसूचित जातीत फूट पडण्यास कारणीभूत ठरत असल्याने ही एकजूट अबाधित राहावी यासाठीच संघर्ष परिषदेचे आयोजन केल्याची भूमिका रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांनी मांडली.
ही परिषद रविवारी (दि.७) सायंकाळी तापडिया नाट्यगृहात पार पडली. या परिषदेच्या अध्यक्षस्थानी आनंदराज आंबेडकर होते. यावेळी इतर मान्यवरही उपस्थित होते. उपवर्गीकरण विरोधी संघर्ष परिषद अनुसूचित जातीत फूट पाडणाच्या विरोधातील एकजुटीचा निर्णायक एल्गार ठरणार असल्याचे मत विविध मान्यवरांनी व्यक्त केले.
या परिषदेत राज्यभरातील अनुसूचित जातीतील विविध समाजघटकांचे प्रतिनिधी, साहित्यिक, कवी, विचारवंत, सामाजिक व राजकीय पक्ष संघटनांचे कार्यकर्ते, कर्मचारी संघटना, शिक्षक, प्राध्यापक, वकील, संशोधक, अभ्यासक, विद्यार्थी प्रतिनिधी आणि आंबेडकरी चळवळीतील विविध संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.