Water supply to the city from outdated tankers
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरातील ज्या भागात जलवाहिन्या नाहीत. तेथील नागरी वसाहतींना महापालिका टँकरद्वारे पाणीपुरवठा करते. या नो नेटवर्क झोनमधील पाणीपुरवठ्यासाठी महापालिकेने कंत्राटदार नियुक्त केले आहेत. परंतु, या कंत्राटदाराकडून अक्षरशः कालबाह्य टँकर, ट्रॅक्टर ट्रॉलीतून पाणीपुरवठा केला जात असून त्याचा प्रत्यक्ष अनुभव बुधवारी आला. पाणीपुरवठा सुरू असताना ट्रॅक्टर ट्रॉलीचे चाक अचानक तुटले. त्यामुळे आता महापालिकेने कंत्राटदाराला नोटीस बजावून फिटनेस प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
शहराच्या नो नेटवर्क भागातील वसाहतींना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेने दोन कंत्राटदार नियुक्त केले आहे. यात एका कंत्राटदाराला सिडको, हडकोसह सातारा देवळाईतील काही वसाहतींना पाणीप-खठ्याचे कंत्राट देण्यात आले असून त्याबाबत कंत्राटदारांशी करारही केला आहे.
हा करार करतानाच महापालिकेने प्रत्येक वाहनांच्या क्रमांकासह त्यांचा विमा, फिटनेस प्रमाणपत्र आहे की नाही. याची शहानिशा करणे आवश्यक आहे. त्याविना कुठल्याही शासकीय कार्यालयांकडून वाहन वापराबाबत करार करण्यात येत नाही. मात्र, असे असतानाही मागील अनेक वर्षांपासून कंत्राटदाराकडून शहरात पाणीपुरवठ्यासाठी जे कालबाह्य टँकर, ट्रॅक्टरट्रॉली वापरली जात आहे.
त्याकडे दुर्लक्षच करण्यात आल्याचा प्रकार बुधवारी ट्रॅक्टरट्रॉलीचे चाक तुटल्यानंतर उघडकीस आले आहे. एमएच २० सीआर-७०६२ असे त्या ट्रॅक्टरचा क्रमांक होता. मात्र, या घटनेनंतर कंत्राटदाराला संपूर्ण वाहनांचे फिटनेस प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश अतिरिक्त शहर अभियंता अनिल तनपुरे यांनी दिले आहे.