Water supply disrupted for second consecutive day
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : फार-ोळा जलशुद्धीकरण केंद्रात शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ७००, ९०० आणि १२०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीचा वीजपुरवठा रविवारी सायंकाळी अचानक खंडित झाला. त्यामुळे तिन्हा जलवाहिन्यांचा पाणीपुरवठा पूर्णतः बंद झाला. अखेर बिघाड लक्षात आल्यानंतर ९०० ची जलवाहिनी बंद ठेवून उर्वरित दोन्ही जलवाहिन्यातून पुरवठा सुरू करण्यात आला. परंतु, दीड तासाच्या खंडामुळे पुन्हा शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.
दिवाळीच्या तोंडावर शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी अचानक फुटली. त्यामुळे ऐन सणासुदीत शहराचा पाणीपुरवठा अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली होती. परंतु, महापालिका पाणीपुरवठा विभागाने युद्धपातळीवर प्रयत्न करून शहराचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवला.
काही भागांतील पाण्याचे टप्पे उशिराने तर काही ठिकाणचे टप्पे एक दिवस पुढे ढकलण्यात आले होते. परंतु, त्यानंतर पुरवठा दोन दिवसांतच सुरळीत करण्यात प्रशासनाला यश आले. मात्र, असे असले तरी मागील चार दिवसांपासून शहराच्या पाणीपुरवठ्याला सतत महावितरणाचा शॉक वसत आहे. ढोरकीन येथे शुक्रवारी ७०० आणि ९०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीचा वीजप-रवठा खंडित झाला होता.
या दुरुस्तीला तब्बल १२ तास २० मिनिटांचा अवधी लागला. त्यामुळे जुन्या शहरातील अनेक वसाहतींचा पाणीपुरवठा एक दिवस पुढे ढकलण्याची वेळ महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागावर आली होती. यातून सुटका होत नाही तोच रविवारी फारोळ्यात अचानक मोठा आवाज येऊन वीज पुरवठा खंडित झाला. त्यामुळे पाणीप-रवठा विभागाने तिन्ही जलवाहिन्यांचे पंप बंद करून विघाड शोधण्यास सुरुवात केली.
परंतु, दीड तासानंतर विघाड ९०० च्या वीजपुरवठ्यात आढळला. जुन्या दोन्ही योजनांच्या वीजपुरवठा सुरू झाल्याने त्यातून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. तर ९०० च्या जलवाहिनीला वीजपुरवठा करणाऱ्या वाहिनीवर मोठा बिघाड झाल्याने त्याची दुरुस्ती शक्य झाली नाही. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत या जलवाहिनीचा पाणीपुरवठा बंद होता. दीड तासाच्या खंडामुळे पुन्हा शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तिन्ही जलवाहिन्यांपैकी ९०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीचा पाणीपुरवठा वीजपुरवठ्याअभावी बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्यात ६२ एमएलडीची घट झाली आहे. त्याचा परिणाम पाणीपुवठ्यावरही होणार आहे.