छत्रपती संभाजीनगर

मराठवाड्यात ३१९ टँकरने पाणीपुरवठा

Arun Patil

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मराठवाड्यात पावसाचा खंड आणि अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले. नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांना अतिवृष्टीचा फटका सहन करावा लागला आहे, तर उर्वरित सहा जिल्ह्यांत पावसाने दडी मारल्यामुळे पाणीप्रश्न भेडसावत आहे. सध्या मराठवाड्यात 319 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच मोठ्या धरणांमध्ये केवळ 36 टक्केच जलसाठा शिल्लक राहिला आहे. कर्जबाजारी, नापिकी आणि वेगवेगळ्या कारणांतून मराठवाड्यातील 1097 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यात मागील जानेवारी महिन्यातदेखील जालना जिल्ह्यातील 19 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. यामुळे मराठवाड्यातील दुष्काळाची दाहकता अधिक तीव्र होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

जून-जुलै 2023 या काळात पावसाला उशिरा सुरुवात झाली. यामुळे खरिपाच्या पिकांचे नुकसान झाले. जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड आणि लातूर येथील 6 लाख 46 हजार 295 शेतकर्‍यांना याचा फटका प्रामुख्याने सहन करावा लागला. त्यांच्या 5 लाख 9 हजार 716.65 हेक्टरमधील जिरायत, बागायत आणि फळपिकांचे नुकसान झाले. याच काळात नांदेड आणि हिंगोली जिल्ह्याला अतिवृष्टीचा फटका सहन करावा लागला. त्यानंतर सप्टेंबरमध्ये गौरी-गणपतीच्या दरम्यान दमदार पाऊस झाला. त्यावर खरिपाच्या पिकांनी तग धरला. मात्र, पुढे पावसाने पुन्हा दगा दिल्यामुळे पिकांनी माना टाकल्या.

आभाळाकडे डोळे लावलेल्या शेतकर्‍यांनी ऑक्टोबर महिन्यात रब्बीची पेरणी केली. या महिन्यात तुरळक पाऊस झाला. त्यावर पिकांची वाढ खुंटल्यामुळे शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले. नोव्हेंबर महिन्यात कोसळलेल्या अवकाळी पावसाने आणि गारपिटीने वाढ झालेली पिकेही उद्ध्वस्त केली. यामुळे बळीराजा पुरता हतबल झाला. दुष्काळामुळे पाणीप्रश्न अधिकच चिंतेचा बनला आहे. दुष्काळाची दाहकता पाहता 380 विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे, तर छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यांतील 255 गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

SCROLL FOR NEXT