मराठवाड्यात टँकरची संख्या तीनशेच्या पार pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Marathwada water crisis : मराठवाड्यात टँकरची संख्या तीनशेच्या पार

उन्हाचा पारा वाढत गेला त्याप्रमाणे तहानलेल्या गावांची संख्या व सोबतच टँकरच्या संख्येतही भर पडत गेली.

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात पाणीटंचाईची तीव्रता दिवसेंदिवस अधिक तीव्र होत आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात विभागातील छत्रपती संभाजीनगरसह विभागातील चार जिल्ह्यांत 92 गावे आणि 36 वाड्यांना 156 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू होता. आता विभागातील 179 गावांसह 88 वाड्यांना 20 शासकीय आणि 288 खासगी अशा एकूण 308 टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे.

यंदा एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील चार गावांतून टँकरची मागणी झाली. उन्हाचा पारा वाढत गेला आणि त्या प्रमाणात टँकरच्या संख्येतही भर पडत असल्याचे चित्र आहे. एप्रिल अखेर छत्रपती संभाजीनगर, जालना आणि लातूर जिल्ह्यांतील तहानलेल्या गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू होता. दरम्यान, उन्हाचा पारा वाढत गेला त्याप्रमाणे तहानलेल्या गावांची संख्या व सोबतच टँकरच्या संख्येतही भर पडत गेली. टँकरमुक्त असलेल्या अन्य जिल्ह्यांतील तहानलेल्या गावांतून टँकर मागणीचे प्रस्ताव सादर होत आहेत.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पाणीटंचाईचा प्रश्न सर्वाधिक गंभीर असल्याचे चित्र आहे. 10 मे दरम्यान, 101 गावे व 25 वाड्यांना 160 टँकरद्वारे पाणीपुरवठा जिल्ह्यात सुरू होता. तर सध्या 115 गावे व 38 वाड्यांना 194 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असल्याचे विभागीय आयुक्तालयाच्या सूत्रांनी नमूद केले. यासह जालना जिल्ह्यातील 40 गावे आणि 31 वाड्यांना 68 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यासह परभणी जिल्ह्यातील सहा गावांना 11 टँकरद्वारे, हिंगोली जिल्ह्यातील एक गाव व तीन वाड्यांना दोन टँकरद्वारे, नांदेड जिल्ह्यातील चार गावे व 15 वाड्यांना 14 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.

बीड जिल्ह्यातील चार गावांना आठ टँकरद्वारे तसेच लातूर जिल्ह्यातील दोन गावे आणि एका वाडीला दोन टँकरद्वारे, तर धाराशिव जिल्ह्यातील तहानलेल्या सात गावांना नऊ टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. अशा प्रकारे मराठवाड्यातील या आठ जिल्ह्यांतील 179 गावे आणि 88 वाड्यांना मिळून 308 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे, अशी माहिती विभागीय आयुक्तालयाच्या सूत्रांनी दिली.

958 विहिरींचे अधिग्रहण

मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. 28 मेच्या अहवालानुसार, मराठवाड्यात एकूण 958 खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले. यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 164, जालना 68, परभणी 54, हिंगोली 49, नांदेड 265, बीड 192, धाराशिव 69, तर लातूर जिल्ह्यातील 97 विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले. यात टँकरसाठी 171 गावांतील 162 विहिरींचे, तर टँकरव्यतिरिक्त 578 गावांतील 796 विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT