Water Scarcity: Appeal to Deputy Chief Minister for Gangapur water issue
गंगापूर, पुढारी वृत्तसेवा : गंगापूर शहरातील वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर शहरवासीयांना स्वच्छ व नियमित पाणीपुरवठा मिळावा यासाठी लोकनियुक्त नगराध्यक्ष संजय जाधव यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची भेट घेत शहराच्या पाणीप्रश्नाबाबत सविस्तर चर्चा केली.
आमदार सतीश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर शहरातील नागरिकांना दररोज स्वच्छ आणि नियमित पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी शासन स्तरावर प्रभावी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
दिवंगत अजित पवार यांनी गंगापूर शहराला स्वच्छ आणि नियमित पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिले होते. गंगापूरकरांनी त्यांच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत भरघोस मताधिक्याने निवडून दिल्यानंतर आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही अजितदादांनी दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असे आश्वासन दिले.
यावेळी गंगापूर नगरपरिषदेच्या नवीन पाणीपुरवठा योजनेला तातडीने मंजुरी देण्यात यावी तसेच पाणीपुरवठा विभागाची विशेष बैठक बोलावण्यात यावी, अशी मागणी नगराध्यक्ष संजय जाधव यांनी केली. उपमुख्यमंत्री पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने बैठक आयोजित करण्याच्या त्यावर सूचना दिल्या. या भेटीदरम्यान प्रदेश सरचिटणीस दिलीप बनकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
कायमस्वरूपी तोडगा काढावा
शहराच्या भविष्यातील पाण-ीप्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी नवीन योजनेला गती देण्याची आवश्यकता असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. गंगापूर शहराची वाढती लोकसंख्या, उन्हाळ्यातील तीव्र पाणीटंचाई आणि नागरिकांची गैरसोय लक्षात घेता शासनाने या प्रश्नाकडे गांभीयनि लक्ष द्यावे, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.